प्रियांका यांच्या निवासस्थानात कारने घुसखोरी

सुरक्षाविषयक त्रुटीचा मुद्दा सीआरपीएफकडे उपस्थित
नवी दिल्ली : कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी प्रियांका यांच्या येथील निवासस्थानाच्या आवारात एका अनोळखी कारने प्रवेश केला. त्या घटनेनंतर सुरक्षाविषयक त्रुटीचा मुद्दा केंद्रीय राखीव पोलीस दलाकडे (सीआरपीएफ) उपस्थित करण्यात आला.
केंद्र सरकारने मागील महिन्यात कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, त्यांच्या कन्या प्रियांका आणि पुत्र राहुल यांना पुरवण्यात आलेली स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपची (एसपीजी) सुरक्षा काढून घेतली. त्याऐवजी त्यांना झेड प्लस दर्जा सुरक्षा पुरवण्यात आली. त्यामुळे गांधी परिवारातील सदस्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सीआरपीएफवर आली आहे. त्यावरून विरोधकांकडून आणि विशेषत: कॉंग्रेसकडून केंद्र सरकारला टीकेचे लक्ष्य केले जात आहे. अशातच प्रियांका यांचे सुरक्षाकवच भेदण्यात आल्याशी संबंधित माहिती पुढे आली आहे.
प्रियांका दिल्लीतील लोधी इस्टेट भागात निवासस्थानात राहतात. त्यांच्या निवासस्थानाच्या आवारात 26 नोव्हेंबरला अचानकपणे एक कार पोहचली. थेट पोर्चजवळ पोहचलेल्या त्या कारमधून सात जण उतरले. त्यामध्ये प्रत्येकी तीन पुरूष आणि महिला तसेच एका मुलीचा समावेश होता. कारमधून ते लोक उतरले त्यावेळी प्रियांका निवासस्थानाबाहेरच होत्या.
आंगतुक पाहुण्यांनी प्रियांका यांच्या जवळ जात त्यांच्याबरोबर फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली. प्रियांका यांनी कुठलेही आढेवेढे न घेता त्यांच्याशी संवाद साधला. फोटो काढून झाल्यावर अनपेक्षितपणे आलेले ते पाहुणे निघून गेले.





