पुणे | अंमली पदार्थ तस्करीला ब्रेक

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – रेल्वेतून होणारी अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी लाेहमार्ग पोलिसांकडून कडक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. लोहमार्ग पोलीस, तसेच रेल्वे सुरक्षा दलाकडून (आरपीएफ) काटेकोर तपासणी करण्यात येत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली.
ललित पाटील प्रकरण, कुरकुंभ ओैद्योगिक वसाहतीतून तीन हजार ७०० कोटींचे जप्त केलेले मेफेड्रोन, तसेच फर्गसन रस्त्यावरील एल थ्री बारमधील पार्टी प्रकरणात अंमली पदार्थांचे सेवन केल्याचे उघडकीस आल्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी रेल्वेतून अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी कडक उपाययोजना सुरू केल्या आहेत.
ही तस्करी रोखण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाची मदत घेण्यात येत आहे. प्रवाशांकडून गांजा जप्त केल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. स्थानक परिसरात लोहमार्ग पोलीस पथकाला तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत.
दोशी म्हणाले, रेल्वेतून अंमली पदार्थांच्या तस्करीचे प्रमाण कमी आहे. गांजासारख्या पदार्थांची तस्करी रेल्वेतून होते. मात्र, हे प्रमाण कमी आहे. त्यामुळे ठराविक मार्गावरील रेल्वे गाड्यांची तपासणी करण्याच्या सूचना लोहमार्ग पोलिसांना दिल्या आहेत. रेल्वेस्थानक परिसरातील संशयितांचीही तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
फलाटालगत गांजाविक्री
रेल्वे ट्रॅक आणि फलाटावर अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. बेघर, तसेच कामगार व्यक्ती फलाटालगत गांजाचे सेवन करताना आढळतात, तर अनेकदा ट्रॅकच्या कडेला त्याची विक्री होताना दिसते.





