Pune District : हवेली तालुक्यात भाजप-राष्ट्रवादीत काट्याची टक्कर
Pune District : तालुक्यातील सर्वच मतदारसंघात भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात थेट लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोणी काळभोर : आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी हवेली तालुक्यातील पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या तालुक्यातून 6 जागांसाठी 25 तर हवेली पंचायत समितीच्या 12 जागांसाठी 42 उमेदवार अंतिम रिंगणात आहेत. तालुक्यातील सर्वच मतदारसंघात भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात थेट लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी जिल्हा परिषदेसाठी प्रत्येकी 6 तर पंचायत समितीसाठी प्रत्येकी 12 उमेदवार मैदानात उतरवले आहेत.
वंचित बहुजन आघाडीने जिल्हा परिषदेसाठी 2 आणि पंचायत समितीसाठी 1 उमेदवार दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पंचायत समितीची एक जागा लढवत आहे. शिवसेना (शिंदे गट) जिल्हा परिषदेसाठी 3 तर पंचायत समितीसाठी 4 जागांवर, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) जिल्हा परिषदेसाठी 3 आणि पंचायत समितीसाठी 2 जागांवर निवडणूक लढवत आहे. राष्ट्रीय समाज पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना व संभाजी ब्रिगेड पार्टी यांनी पंचायत समितीच्या प्रत्येकी एका जागेवर उमेदवार उभे केले आहेत. उर्वरित जागांवर अपक्ष उमेदवारांनी निवडणूक रंगतदार केली आहे.
जिल्हा परिषदेच्या थेऊर व कोरेगाव मुळ गटात प्रत्येकी केवळ दोन उमेदवार असल्याने येथे सरळ लढत होत आहे. तर लोणी काळभोर गटात सर्वाधिक 7 उमेदवार रिंगणात आहेत. पंचायत समितीमध्ये खानापूर गणात सर्वाधिक 5 उमेदवार असून थेऊर व आव्हाळवाडी गणात प्रत्येकी दोन उमेदवार असल्याने येथेही थेट लढत होणार आहे.
लोणी काळभोर जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसकडून शीतल कांबळे, भाजपकडून पूनम गायकवाड, बहुजन समाज पक्षाकडून निता आवारे, शिवसेना (उबाठा) कडून कलावती ढेले, शिवसेना (शिंदे गट) कडून सिंपल कांबळे यांच्यासह दोन अपक्ष उमेदवार रुपाली कोरे व स्वाती थोरात असे एकूण सात उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
लोणी काळभोर पंचायत समिती गणात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (शिंदे गट) व एक अपक्ष असे चार उमेदवार आहेत. कदमवाकवस्ती गणात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, दोन्ही शिवसेना, वंचित बहुजन आघाडी व दोन अपक्ष असे एकूण सात उमेदवार रिंगणात आहेत.
मनधरणी, आश्वासने व राजकीय डावपेच
हवेली तालुक्यात उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर राजकीय घडामोडी घडल्या. पक्षश्रेष्ठींनी मनधरणी, आश्वासने व राजकीय डावपेच राबविल्याने तब्बल 25 हून अधिक उमेदवारांनी माघार घेतली. नाराज उमेदवारांना थांबवण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी थेट हस्तक्षेप केल्याचे चित्र पाहायला मिळाले. आता भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी पूर्ण ताकद पणाला लावत प्रचाराला वेग दिला असून विकासकामांचे दावे, मागील कारकिर्दीचा हिशोब आणि नेतृत्वाची तुलना यावरच निवडणूक रणनिती केंद्रित होणार आहे.





