ठाकरे गटाच्या शिलेदाराला मोठा दिलासा; खिचडी घोटळ्याप्रकरणी अखेर जामीन मंजूर

Suraj Chavan | शिवसेना ठाकरे गटातील युवासेनेचे नेते आणि आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. खिचडी घोटाळ्यात ईडीने त्यांना अटक केली होती. मागील एक वर्षांपासून सूरज चव्हाण हे तुरुंगात होते. परंतु आता सूरज चव्हाण यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
कोरोना काळात महानगर पालिकेला खिचडीचं कंत्राट पुरवताना पॅकेटमध्ये ठरल्यापेक्षा कमी खिचडी दिल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर 17 जानेवारी 2024 ला ईडीने सूरज चव्हाण यांना अटक केली होती. सूरज चव्हाण हे युवासेनेचे पदाधिकारी आहेत. सूरज चव्हाण यांच्यासह ठाकरे गटाचे उपनेते अमोल किर्तीकर यांचीही चौकशी करण्यात आली होती.
मात्र आता हायकोर्टाने सूरज चव्हाण यांना एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन दिला आहे. सूरज चव्हाण यांनी जामीनासाठी पीएमएलए कोर्ट आणि सत्र न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली होती. परंतु त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. अखेर सूरज चव्हाण यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला. वर्षभर तुरुंगवासाची शिक्षा भोगल्यानंतर ते आता जेलबाहेर येणार आहेत.
खिचडी घोटाळा नेमका काय?
कोरोना काळामध्ये स्थलांतर करणाऱ्या गरीब कामगारांसाठी आणि ज्या लोकांचे मुंबईमध्ये घर नाही अशा कामगारांसाठी लॉकडाऊनच्या काळात जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय त्यावेळच्या ठाकरेंच्या सरकारने घेतला होता. केंद्र सरकारनेही त्याला पाठिंबा दर्शवला होता. मुंबई महापालिकेने एकूण 52 कंपन्यांना खिचडी देण्याचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेलं होतं. सुरुवातीच्या चार महिन्याच्या काळात चार कोटी खिचडी पॅकेट्स वाटण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली होती. या कामात घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला.
कोण आहे सूरज चव्हाण?
सूरज चव्हाण यांनी सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून राजकीय प्रवासाला सुरुवात केली. सूरज चव्हाण यांनी आदित्य ठाकरेंसोबत युवासेनेसाठी खूप काम केले आहे. युवासेनेचा कार्यकर्ता, आदित्य ठाकरेंचा विश्वासू म्हणूनही त्यांची ओळख आहे. ठाकरे गटाचे सचिव म्हणूनही सूरज चव्हाण यांनी काम पाहिले आहे.
हेही वाचा:





