Palestinians killed : गाझामध्ये एकाच दिवसात ९१ पॅलेस्टिनी ठार

गाझा सिटी : इस्रायली सैन्याने गाझामध्ये एकाच दिवसात ९१ पॅलेस्टिनींची हत्या केली आहे. त्यामध्ये एका प्रसिद्ध डॉक्टरच्या कुटुंबातील सदस्यांसह आणि उत्तर गाझा शहरातून पळून जाणाऱ्या अनेक लोकांचा समावेश आहे. शनिवारी झालेल्या हल्ल्यांमध्ये निवासी घरे, निवारागृहे, विस्थापित लोकांसाठी तंबू आणि गाझा शहर स्थलांतरित करण्यासाठी नागरिकांना घेऊन जाणाऱ्या ट्रकला लक्ष्य करण्यात आले.
या हल्ल्यांमध्ये किमान ७६ लोक ठार झाले. बळींमध्ये गाझाच्या सर्वात मोठे रुग्णालय असलेल्या अल-शिफाचे संचालक मोहम्मद अबू सलमिया यांचे नातेवाईक होते. त्यांच्या कुटुंबाच्या घरावर हल्ला झाला तेव्हा त्यांचा भाऊ, मेहुणी आणि त्यांची मुले ठार झाली. गाझा सिटीच्या नसर भागात इस्रायली सैन्याने केलेल्या आणखी एका हल्ल्यात एका ट्रकवर रॉकेटचा मारा झाला. त्यामध्ये किमान चार जण ठार झाले.
इस्रायली सैन्याने स्फोटकांनी भरलेले रोबो देखील वापरले आहेत. हे रोबो संपूर्ण क्षेत्र जमिनदोस्त करून टाकत आहेत आणि अमर्याद नुकसान करत आहेत. प्रत्येक वेळी जेव्हा ते स्फोट होतात तेव्हा भूकंप झाल्यासारखे वाटते, असे काही रहिवासी म्हणत आहेत.
परिस्थिती खूप धोकादायक असल्याने डॉक्टर आणि बचावकर्ते अडकलेल्या किंवा जखमी झालेल्या अनेक नागरिकांपर्यंत पोहोचू शकले नाहीत. पॅलेस्टिनी सिव्हिल डिफेन्सच्या मते ऑगस्टपासून गाझा शहरावर इस्रायलने केलेल्या हल्ल्यामुळे सुमारे दहा लाख लोकसंख्येतील ४,५०,००० हून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. गेल्या दोन आठवड्यात २० टॉवर ब्लॉक पाडल्याचा दावा इस्रायली सैन्याने केला आहे. अनेक विस्थापित पॅलेस्टिनी आता निवारा शोधण्यासाठी धडपडत आहेत.
ओलीस गाझामध्ये विखुरलेले…
गाझामधील उर्वरित ४८ कैदी गाझा शहरातील परिसरात विखुरलेले आहेत आणि इस्रायलच्या चालू हल्ल्यामुळे त्यांना धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा हमासने दिला आहे. हमासची सशस्त्र शाखा असलेल्या कासम ब्रिगेड्सने शनिवारी बंदिवानांचा एक संकलन फोटो प्रसिद्ध केला आणि हा फोटो म्हणजे निरोपाचे चित्र असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, तेल अवीवमध्ये हजारो लोकांनी रॅली काढून युद्ध तात्काळ थांबवण्याची मागणी केली. हमासशी करार करून कैद्यांची सुटका करावी यासाठी पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यावर दबाव आणला. गाझामध्ये सुरू असलेली इस्रायलच्या विस्तारीत लष्करी कारवाई ही त्यांच्या प्रियजनांसाठी मृत्युदंडाची शिक्षा ठरू शकते, असे गाझामधील ओलिसांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.





