Satara News : उदयनराजे भोसले यांच्यासह ९ जण भाजपच्या राज्य परिषदेवर

सातारा : भारतीय जनता पक्षाने प्रदेशाध्यक्ष निवडल्यानंतर आता राज्य कार्यकारिणीच्या राज्य परिषदेची घोषणा केली आहे. या परिषदेमध्ये जिल्ह्यातून खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह नऊ जणांची वर्णी लागली आहे.
प्रदेश कार्यकारिणीने याबाबतच्या नवीन नियुक्तींची घोषणा नुकतीच केली. प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांची निवड झाल्यानंतर लगोलग संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने 2025 ते 2028 या तीन वर्षासाठी राज्य परिषदेच्या कार्यकारिणीची निवड जाहीर करण्यात आली आहे.
ही कार्यकारिणी राज्य पातळीवर काम करते. जिल्ह्यातून खासदार उदयनराजे भोसले, आमदार मनोज घोरपडे, माजी आमदार मदन भोसले, पक्षात नुकतेच प्रवेश केलेले सत्यजित पाटणकर, सातारा विधानसभा मतदारसंघाचे संयोजक अविनाश कदम, आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी डॉ. प्रिया शिंदे, कराड दक्षिणचे हर्षवर्धन मोहिते, संजय पवार संतोष गावडे व भीमराव पाटील यांची वर्णी राज्य परिषदेवर लागली आहे.
ही कार्यकारणी 2025 ते २०२८ या तीन वर्षांसाठी सक्रिय राहणार आहे. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीमध्ये पालकत्वाची भूमिका घेणे तसेच पक्षाच्या ध्येयधोरणाचा प्रसार व प्रचार तसेच प्रदेश कार्यकारिणीने आखून दिलेल्या कार्यक्रमाची अंमलबजावणी सहभाग व संयोजन या सर्व जबाबदाऱ्या या परिषदेच्या माध्यमातून सर्व सदस्यांनी पार पाडावयाच्या आहेत. राज्य परिषदेच्या नूतन सदस्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.





