पुणे : पुणे जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर होताच जिल्ह्यातील पक्षनिहाय राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे. काही तालुक्यांत अपेक्षित निकाल लागले असताना, काही ठिकाणी धक्कादायक निकालांनी राजकीय समीकरणे बदलल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यातील 146 पैकी तब्बल 90 जागा जिंकत राष्ट्रवादी काँग्रेस नंबर 1 राहिला तर जिल्हा परिषदेप्रमाणेच 28 जागा जिंकत भाजप दुसर्या क्रमांकाचा पक्ष ठरला. त्याखालोखाल शिवसेना 12, शिवसेना (उबाठा) 10, राष्ट्रवादी (शप) 4 व अपक्ष 2 सदस्य निवडून आले आहेत. राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसच्या हाती मात्र भोपळा आला आहे. जिल्ह्यात जिल्ह्यात 9 पंचायत समित्या राष्ट्रवादीकडे आल्या असून दौंड, जुन्नर आणि खेडमधील आमदारांनी आपले गड राखले असून येथे आपल्या विचारांचा सभापती बसवता येणार आहे. तर भोर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रे आणि भाजपला प्रत्येकी चार जागा मिळाल्या असल्याने सामना टाय झाला आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसने मावळ, इंदापूरमध्ये सर्व जागा जिंकत विरोधकांना क्लीन स्वीप दिला आहे. भोर, राजगड, मुळशीचे आमदार असलेले शंकर मांडेकर यांच्या नेतृत्त्वात भोरमध्ये आठपैकी चार, वेल्ह्यात चारपैकी तीन तर होमपीच असलेल्या मुळशीत सहापैकी तीन जागा अशा एकूण मतदारसंघातील 18 पैकी 10 जागा मिळवल्या आहेत. त्यामुळे या तीनपैकी दोन ठिकाणी आणि नशिबाची साथ मिळाल्यास भोरमध्येदेखील त्यांच्या विचारांचा सभापती विराजमान होऊ शकतो. बारामती हे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला आहे. पंचायत समितीत त्यांनी दिलेले सर्व उमेदवार निवडून आले. दोन ठिकाणी त्यांनी उमेदवार दिले नव्हते तेथे भाजपचे सदस्य निवडून आले आहेत. दौंड तालुक्यात भाजपचे आमदार राहुल कुल यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीत सत्ता मिळवण्यात भाजपला यश आले आहे. मात्र जिल्हा परिषदेत सातपैकी केवळ एका जागेवर भाजपला विजय मिळवता आला आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी कहीं खुशी कहीं गम असा निकाल आला आहे. जुन्नर तालुक्यातही दौंडप्रमाणेच परिस्थिती असून आमदार शरद सोनवणे यांनी शिवेसेनेचे उमेदवार निवडून आणण्यासाठी मोठा जोर लावला. जिल्हा परिषदेत शिवसेनेचे तीन सदस्य निवडून आले आहेत; मात्र पंचायत समितीत 16पैकी आठ उमेदवार जिंकून आणत सभापतीपदावर दावा ठोकला आहे. पुरंदर तालुक्यात शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांना नगरपरिषदेनंतर जिल्हा परिषदेतही अपयश आले. तर आठपैकी केवळ दोन जागा शिवसेनेला मिळाल्या. येथे राष्ट्रवादी काँग्रेसला चार तर माजी आमदार संजय जगताप यांनाही भाजपच्या दोनच जागा निवडून आणण्यात यश आले. जिल्हा परिषदेत शिवसेनेचा एकही सदस्य निवडून आलेला नाही. भाजप, राश्ट्रवचादीचे प्रत्येकी दोन सदस्य निवडून आलेत. शिरूर-हवेली मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांना अपेक्षित यश मिळाले नाही. शिरूर तालुक्यात मागील निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या सहा जागा जिंकलेल्या राष्ट्रवादीला यावेळी कमी यश मिळाले. येथे भाजपने मुसंडी मारत तीन जागांवर विजय मिळवला आहे. हवेलीत मात्र राष्ट्रवाचदीने चार व भत्तजप, शिवसेने प्रत्येकी एक जागा मिळवली आहे. शिरूर पंचायत समिती राष्ट्रवादीने राखली असून 114पैकी 8 जागा जिंकल्या आहेत. हवेलीतही 12 पैकी 6 जागांवर यश मिळवले आहे. आंबेगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला पंचायत समितीत 10 पैकी 8 जागा जिंकण्यात यश आले. तर जिल्हा परिरूषदेच्या पाच पैकी तीन जागांवर विजय मिळाला आहे. मागील निवडणुकीत राष्ट्रवादीने चार जागा जिंकल्या होत्या. ठाकरेंच्या शिवसेनेकडे एकमेव पंचायत समिती खेड तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्ह्यातील एकमेव आमदार बाबाजी काळे यांचा करिष्मा पाहायला मिळाला. नुकत्याच झालेल्या नगरपरिषदेत अपेक्षित यश मिळाले नसले तरी खचून न जाता या निवडणुकीत त्यांनी तुल्यबळ उमेदवार दिले आणि ते निवडूनही आले. जिल्हा परिषदेत आठपैकी पाच जागांवर त्यांना यश आले तर पंचायत समितीच्या16 पैकी 9 जागा त्यांना मिळाल्या इंदापूर, मावळमध्ये क्लीन स्वीप इंदापूर तालुक्यात कृषिमंत्री दत्तात्रय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे निवडणुकीपूर्वी एकत्र आले. याचा परिणाम विजयात दिसला. येथे राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषदेच्या सर्व आठ जागांवर तर पंचायत समितीच्या सर्व 16 जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. हीच स्थिती मावळ तालुक्यातही दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. विरोधी भाजपला चारीमुड्या चीत करीत जिल्हा परिषदेच्या पाचपैकी पाच आणि पंचायत समितीच्या दहापैकी दहा जागा जिंकल्या आहेत.