New Delhi : नवी दिल्लीत ८०७ नागरिक बेपत्ता; सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर
देशाची राष्ट्रीय राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

New Delhi – देशाची राष्ट्रीय राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दिल्लीत २०२६ सालातील पहिल्याच महिन्यांत ८०० हून अधिक व्यक्ती बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या आकडेवारीमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत नागरिकांमध्ये गंभीर चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरूवातीच्या ४ आठवड्यांच्या कालावधीत एकूण ८०७ व्यक्ती बेपत्ता झाल्याची नोंद झाली आहे. या आकडेवारीचे सर्वात भयावह पैलू म्हणजे बेपत्ता झालेल्यांमध्ये महिला आणि मुलींचे प्रमाण सर्वाधिक आहे.
एकूण बेपत्ता व्यक्तींपैकी जवळपास दोन तृतीयांश संख्या महिलांची असून, ५०९ महिला व मुली बेपत्ता झाल्या आहेत, तर २९८ पुरुष बेपत्ता झाले आहेत. गणितीय दृष्टीने पाहिले तर, दिल्लीत दररोज सरासरी ५४ व्यक्ती बेपत्ता होत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.
बेपत्ता झालेल्यांमध्ये १९१ अल्पवयीन मुला-मुलींचा समावेश आहे, तर ६१६ व्यक्ती या प्रौढ आहेत. या गंभीर परिस्थितीत दिल्ली पोलिसांनी तातडीने शोधमोहीम हाती घेतली असून, आतापर्यंत २३५ व्यक्तींचा पत्ता लावण्यात त्यांना यश आले आहे.
मात्र, अद्याप ५७२ व्यक्तींचा शोध लागणे बाकी आहेत. अल्पवयीन मुलांचे बेपत्ता होण्याचे प्रमाण पाहता, मानवी तस्करीसारख्या गुन्ह्यांची शक्यताही नाकारता येत नाही.
राजकीय वातावरण तापले :
या आकडेवारीनंतर दिल्लीतील राजकीय वातावरणही तापले आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी या परिस्थितीवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
राष्ट्रीय राजधानीतील नागरिकांची सुरक्षितता वाऱ्यावर असून, गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याची टीका त्यांनी केली आहे. केंद्र सरकार आणि पोलीस प्रशासनाने या प्रश्नावर गांभीर्याने लक्ष देऊन महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी सध्या जोर धरत आहे.





