म्हसवडच्या पाणी प्रकल्पाला 79 कोटींचा निधी

सातारा – केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2 अभियानांतर्गत म्हसवड शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी तब्बल 79 कोटी 11 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून शहराला पाणीपुरवठा करणारी यंत्रणा कार्यान्वित होऊन नागरिकांना दररोज मुबलक शुद्ध पाणी मिळणार आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे यांनी दिली. पाणीपुरवठा प्रकल्पाला निधी मंजूर झाल्याचे समजताच म्हसवडकरांनी जल्लोष केला.
आ. गोरे म्हणाले, “”अमृत 2 अभियानांतर्गत केंद्र शासनाने महाराष्ट्राच्या 18236 कोटींच्या जलकृती आराखड्याला नुकतीच मान्यता दिली आहे. या अभियानातून म्हसवड नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा प्रकल्पाला 79 कोटी 11 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला.
या निधीतून वर्किंग सर्व्हे, जॅक वेल आणि पंप हाऊस, हेड वर्क आणि सोलरसाठी मीटर रुम, रॉ वॉटर रायझिंग मेन, 12 किलोमीटर लांबीच्या पाइपलाइनचे सक्षमीकरण, पाणी प्रक्रिया प्रकल्प, स्टाफ निवासस्थाने, शुद्ध पाणीपुरवठा पाइपलाइन, एएसआर दुरुस्ती, वितरण व्यवस्था, अल्ट्रासॉनिक पाणी मीटर्स, संरक्षक भिंती, शुद्ध पाणी पंपिंग यंत्रसामग्री, सोलर पॉवर प्लॅंट, आवश्यक रस्ते अशी अनेक कामे केली जाणार आहेत. म्हसवडमध्ये सहा वर्षापूर्वी आमची सत्ता होती. तेव्हा आम्ही प्रामाणिकपणे शहराचा सर्वांगीण विकास साधण्यावर भर दिला होता. अनेक मोठी कामे पूर्णही केली. मात्र, विरोधकांनी स्थानिक नेतृत्त्वाचा तकलादू मुद्दा उपस्थित करत नागरिकांना भूलथापा दिल्या. त्यांच्या ताब्यात सत्ता गेल्यावर गेल्या सहा वर्षात कटकारस्थानांमुळे शहराची अवस्था अत्यंत वाईट झाली. जनतेला दहा ते बारा दिवसानंतरही पाणी मिळणे मुश्कील झाले आहे. आम्ही केलेल्या विकासकामांची त्यांना साधी देखभालही करता आली नाही.”
म्हसवडच्या जनतेने माझ्यावर सुरुवातीपासूनच मोठा विश्वास दाखवला आहे. त्या विश्वासाला तडा जाऊ न देता मी शहराच्या विकासासाठी कटीबद्ध आहे. आमच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जनतेची गरज लक्षात घेऊन मागणी केली. मुख्याधिकाऱ्यांनी अंदाजपत्रक बनवताच शासन स्तरावर पाठपुरावा आणि प्रयत्न करुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हा निधी मिळाला आहे. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव शिंदे, धनश्रीदेवी राजेमाने, माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा, सुरेश म्हेत्रे, विजय धट, नितीन दोशी, डॉ. वसंतराव मासाळ, धनाजी माने, शिवाजीराव लोखंडे, अकिल काझी, रवींद्र वीरकर, संजय सोनवणे, संजय जगताप, मारुती
जगताप आणि भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
म्हसवडकर वैतागले भूलथापांना…
गेल्या पाच वर्षात सत्तेत राहिलेल्यांच्या भूलथापांना म्हसवडकर पुरते वैतागले आहेत. शहराच्या विकासाचा बोजा त्यांना सहनच झाला नाही. राज्यात त्यांची सत्ता होती तरी त्यांना एकही विकासकाम काम करता आले नाही. पाच वर्षात जनतेला नरकयातना भोगाव्या लागल्या. आ. जयकुमार गारे यांनी भाजप युतीची सत्ता येताच शहराच्या इतिहासातील सर्वात मोठे काम मंजूर करुन आणल्याचे उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले.





