पुणे | अकरावी प्रवेशासाठी ७८ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी

पुणे, ( प्रभात वृत्तसेवा)- पुणे, पिंपरी- चिचवड महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावीच्या नियमित प्रवेश फेरीला सुरुवात झाली असून अकरावी प्रवेशासाठी ७७ हजार ९२४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यातील कॅप अंतर्गत २५ हजार विद्यार्थ्यांनी दोन दिवसात अर्जाचा भाग- २ भरून कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदविले आहे.
केंद्रीय अॉनलाईन पध्दतीने अकरावी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. ६० हजार ८१२ विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग-१ भरुन ते लॉक केले आहेत.
त्यातील २८ हजार २७७ अर्जांची ऑनलाइन पडताळणी तर २९ हजार ६९३ अर्जांची मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून पडताळणी झाली आहे. ३४३ महाविद्यालयांत १ लाख १९ हजार ९७० प्रवेशाच्या जागा उपलब्ध झालेल्या आहेत. कॅप अंतर्गत ९३ हजार ४६३ व कोटाअंतर्गत २६ हजार ५०७ प्रवेशाच्या जागा आहेत. कोटा प्रवेशासाठी ३ हजार ५५३ विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरले आहेत.
पहिल्या नियमित प्रवेशांतर्गत अर्जाचा भाग- १ व २ भरणे, प्रवेशासाठी पसंतीक्रम नोंदविणे व ऑनलाइन सादर करणे, विद्यार्थ्यांना भाग- २ मध्ये किमान एक व कमाल १० महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदविणे, अर्ज प्रमाणित करणे या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदविण्यासाठीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.





