दक्षिण गाझातील इस्रायली हल्ल्यात ७१ पॅलेस्टिनी ठार

जेरुसलेम – इस्रायलच्या सैन्याने गाझाच्या दक्षिणेकडील भागात आज केलेल्या हल्ल्यामध्ये किमान ७१ पॅलेस्टिनी ठार झाले आणि इतर अनेक जखमी झाले आहेत, असे गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. खान युनिस शहरातील हा हल्ला हमासच्या लष्करी शाखेचा प्रमुख मोहम्मद डेफ याला लक्ष्य करण्यासाठी केला गेला होता, असे इस्रायलने म्हटले आहे. गेल्या वर्षीच्या हमासच्या भीषण हल्ल्यामागील अनेक सूत्रधारांपैकी हा एक होता, असे इस्रायलने म्हटले आहे.
डेफ हा इस्रायलसाठीच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीमध्ये अनेक वर्षांपासून होता. इस्रायलने त्याला मारण्यासाठी केलेल्या अनेक प्रयत्नातून तो बचावला होता. इस्रायलने शनिवारी केलेल्या हल्ल्यामध्ये हमासचा राफा सलेमा हा आणखीन एक वरिष्ठ म्होरक्या मारला गेल्याचे इस्रायलमधील अनधिकृत सूत्रांनी म्हटले आहे. मात्र हे दोघेही या हल्ल्यात ठार झाल्याचा तपशील इस्रायलकडून अधिकृतपणे जाहीर केला गेलेला नाही.
इस्रायलने आज केलेल्या हल्ल्यात २८९ जण जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले गेले आहे. वृत्तसंस्थेने रुग्णालयात ४० मृतदेह आणले गेल्याचे म्हटले आहे. हा हल्ला इस्रायलच्या हद्दीतील मुवासी येथील मानवतावादी क्षेत्रात झाल्याचे समजते आहे. मात्र ते स्पष्ट होऊ शकलेले नाही. इस्रायलने हमासविरोधात युद्ध सुरू केल्यापासून ३८ हजारांपेक्षा जास्त पॅलेस्टिनी ठार झाले आहेत आणि ८८ हजारांपेक्षा जास्त जखमी झाले आहेत.





