Padma Awards : महाराष्ट्रातील 7 मान्यवरांचा ‘पद्म’ सन्मान; रोहित शर्मा, आर. माधवन, अलका याज्ञिक यांचा राष्ट्रपतींकडून गौरव
Padma Awards : राष्ट्रपती भवनातील दिमाखदार सोहळ्यात पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कारांचे वितरण; विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानाची राष्ट्रीय पातळीवर दखल

Padma Awards : देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेल्या पद्म पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनातील ऐतिहासिक ‘गणतंत्र मंडप’ येथे दिमाखदार सोहळ्यात पार पडले. या सोहळ्यात महाराष्ट्रातील सात मान्यवरांना विविध क्षेत्रांतील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्रातील ज्येष्ठ पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांना कला क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल ‘पद्मभूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारतीय संगीतसृष्टीत १६ हून अधिक भाषांमध्ये दोन हजारांहून अधिक गाणी गाऊन त्यांनी अढळ स्थान निर्माण केले आहे.
LIVE: President Droupadi Murmu presents Padma Awards 2026 at Civil Investiture Ceremony-II at Rashtrapati Bhavan https://t.co/u5KmQX0UnS
— President of India (@rashtrapatibhvn) June 23, 2026
तर क्रीडा, कला, वैद्यकीय, उद्योग आणि लोकसंगीत क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सहा मान्यवरांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरविण्यात आले. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार रोहित शर्मा, अभिनेते व दिग्दर्शक आर. माधवन, नवजात शिशुवैद्यकशास्त्रातील अग्रणी तज्ज्ञ डॉ. आर्मिडा फर्नांडिस, वारली परंपरेचे जतन करणारे ज्येष्ठ तारपावादक भिकल्या लाडक्या धिंडा, उद्योगपती अशोक खाडे तसेच दिवंगत अभिनेते सतीश शाह (मरणोत्तर) यांचा या यादीत समावेश आहे. सतीश शाह यांचा पुरस्कार त्यांच्या बंधू अरविंद मामनिया यांनी स्वीकारला.
(वीडियो सोर्स: राष्ट्रपति भवन) pic.twitter.com/NxA6S0DkeM
— ANI_HindiNews (@AHindinews) June 23, 2026
डॉ. आर्मिडा फर्नांडिस यांनी १९८९ मध्ये मुंबईतील सायन रुग्णालयात आशियातील पहिली मानवी दूध बँक सुरू करून वैद्यकीय क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. तर भिकल्या लाडक्या धिंडा यांनी वारली आदिवासी संस्कृतीतील पारंपरिक तारपा वाद्यकलेचे जतन करण्यासाठी आयुष्य वेचले आहे.
या समारंभाला उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
पद्म पुरस्कार वितरणाच्या या दुसऱ्या टप्प्यात देशभरातील एकूण ६५ मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. यंदा केंद्र सरकारने एकूण १३१ पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून त्यामध्ये पाच पद्मविभूषण, १३ पद्मभूषण आणि ११३ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. या पुरस्कारांमध्ये १९ महिलांचा समावेश असून १६ मान्यवरांना मरणोत्तर सन्मान जाहीर करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील या सात मान्यवरांच्या राष्ट्रीय गौरवामुळे राज्यभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





