Karnataka News : बसच्या धडकेत ६ जणांचा मृत्यू; कर्नाटकात एसयूव्हीचा चक्काचूर

Karnataka – कर्नाटकमध्ये बुधवारी सकाळी एक भीषण रस्ता अपघात झाला. यामध्ये सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. विजयपुरा जिल्ह्यातील मंगोलीजवळ कार आणि बसमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेमुळे हा दुर्दैवी अपघात झाला.
एसयूव्ही कार सोलापूरला जात होती. त्यादरम्यान ती मुंबई-बल्लारी बसशी धडकली. या अपघातात एसयूव्हीमधील पाच प्रवासी आणि बस चालकाचा जागीच मृत्यू झाला. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
ही धडक इतकी भीषण होती की कारचे तुकडे तुकडे झाले. गाडीचा पुढचा भाग पूर्णपणे चुराडा झाला. स्फोटाचा आवाज ऐकून लोक घटनास्थळी जमा झाले, त्यानंतर तातडीने पोलिसांना कळवण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. या दुर्दैवी अपघातानंतर घटनास्थळी लोकांची मोठी गर्दी जमली आणि वाहतूक कोंडी झाली, त्यानंतर पोलिसांनी खराब झालेले वाहने रस्त्यावरून काढून वाहतूक कोंडी दूर केली.





