Pune District : विहिरीत पडून 52 वर्षीय महिलेचा मृत्यू; भोर तालुक्यातील घटनेने हळहळ
Pune District : घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राजगड पोलीस स्टेशनचे विलास प्रधान यांनी तात्काळ हवेली आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीमशी संपर्क साधून मदत मागवली.

भोर : तालुक्यातील कांजळे येथे घराजवळील शेतात कामासाठी गेलेल्या ५२ वर्षीय महिलेचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (दि. १८ ऑगस्ट) घडली. सौ. कुसुम केशव जाधव (वय ५२, रा. केंजळे, ता. भोर, जि. पुणे) असे मृत महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुसुम जाधव या घराजवळील शेतात कामासाठी गेल्या होत्या. मात्र, सायंकाळी सुमारे ५ वाजेपर्यंत त्या घरी परतल्या नसल्याने कुटुंबीय व नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला. शोध घेत असताना घराजवळील विहिरीच्या कडेला त्यांची चप्पल आढळून आली. त्यामुळे त्या विहिरीत पडल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. त्यानंतर नातेवाईकांनी राजगड पोलीस स्टेशनला घटनेची माहिती दिली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राजगड पोलीस स्टेशनचे विलास प्रधान यांनी तात्काळ हवेली आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीमशी संपर्क साधून मदत मागवली. माहिती मिळताच हवेली आपत्ती व्यवस्थापन समूहाचे प्रमुख श्री. तानाजी (भाऊ) भोसले यांच्या नेतृत्वाखाली रेस्क्यू टीम आवश्यक साहित्य व मनुष्यबळासह कांजळे येथील घटनास्थळी दाखल झाली.
रेस्क्यू टीमने घटनास्थळाची पाहणी करून सुमारे ७० फूट खोल विहिरीत शोध व बचावकार्य सुरू केले. विशेष म्हणजे, टीमने अवघ्या १० मिनिटांत पाण्यात बुडालेल्या महिलेचा मृतदेह शोधून विहिरीतून बाहेर काढला. त्यानंतर मृतदेह पुढील कायदेशीर व प्रशासकीय कार्यवाहीसाठी राजगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.
या बचावकार्यामध्ये हवेली आपत्ती व्यवस्थापन समूहाचे प्रमुख श्री. तानाजी (भाऊ) भोसले तसेच श्री. गणेशजी सपकाळ, संदीप सोळसकर, प्रतीक महामुनी आणि मनोज शिंदे यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. अत्यंत कमी वेळेत खोल विहिरीत शोध घेऊन मृतदेह बाहेर काढल्याबद्दल रेस्क्यू टीमच्या कार्याचे परिसरातून कौतुक होत आहे.
घटनास्थळी राजगड पोलीस अधिकारी व कर्मचारी, स्थानिक पोलीस पाटील, नागरिक आणि नातेवाईकांनीही आवश्यक सहकार्य केले. या दुर्दैवी घटनेमुळे केंजळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.





