पिंपरी | संजय गांधी निराधार योजनेतील 51 प्रकरणे अपात्र

पिंपळे गुरव,(वार्ताहर) – निगडी येथील तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयात योजनेतील तब्बल 51 लाभार्थींचे प्रकरणे अपात्र झाल्याने ज्येष्ठांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुदतीच्या आत प्रकरण सादर करूनही यावर्षीच्या उत्पन्नाच्या दाखल्याची मागणी करीत असल्याने नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची खंत येथील कार्यालयात आलेल्या ज्येष्ठांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
निगडी येथे तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजनेचे कार्यालय आहे. 31 मार्च अखेर शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून राबविण्यात येणार्या योजनेमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना गट आदी प्रकारच्या योजनेमध्ये निराधार,
वृद्ध व्यक्ती, अंध, दिव्यांग शारीरिक व मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती, निराधार, विधवा, परित्यक्ता, अनाथ बालके, सिकलसेलग्रस्त, भूमिहीन, शेतमजूर इत्यादींनी जीवनमान सुसह्य करण्यासाठी शासनाने राबविलेल्या मासिक अर्थसहाय्य योजनेत सहभाग घेऊन प्रकरणे सादर करण्यात आली होती.
त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीमुळे आचारसंहिता, 13 मे मतदान, 4 जून निकाल यामुळे शासकीय यंत्रणा ठप्प झाली होती. तब्बल अडीच महिन्यांनी संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयात राबविण्यात आलेल्या योजनेची प्रकरणे हाताळून वरिष्ठांच्या आदेशानुसार लाभार्थीना पुन्हा यावर्षीचे उत्पन्न दाखले जोडण्यासाठी शेरे देण्यात आले आहेत. याबाबत संजय गांधी निराधार योजनेचे स्वतंत्र हवेली तहसीलदार अमोल कदम यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
दिलेल्या मुदतीच्या 31 मार्च अखेर प्रकरण सादर करताना 2023-2024 या वर्षीचा उत्पन्न दाखला प्रकरणाला जोडण्यात आले होते. मात्र प्रकरण अपात्र ठरवून पुन्हा 2024-2025 या वर्षीचा उत्पन्न दाखला प्रकरणाला जोडण्यासाठी येथील कार्यालयातील संबंधित अधिकार्यांकडून सांगण्यात आले.
यावेळी ज्येष्ठांनी नाराजी व्यक्त करीत आम्हाला हा भूर्दंड का? वेळेत प्रकरणे सादर केलेली असताना पुन्हा या वर्षीचा उत्पन्न दाखला जोडून देण्याचा अट्टाहास का? आम्हा ज्येष्ठांचा जरा तरी विचार करावा.
याबाबत माहिती देता येणार नाही. सदर संजय गांधी निराधार योजनेसाठी स्वतंत्र तहसीलदार आहेत.
-जयराम देशमुख, तहसीलदार
31 मार्च अखेर जी प्रकरणे आली होती त्यांना आपण या वर्षीचे उत्पन्न दाखले मागितले नाही. ती 51 प्रकरणे पडताळणीसाठी कधी आली होती ते पहावे लागेल. -अमोल कदम, तहसीलदार, संजय गांधी निराधार योजना
निवडणूक आचारसंहिता यामुळे 31 मार्च अखेरची प्रकरणे पाठविण्यास विलंब झाला. त्यामुळे अपात्र प्रकरणांना यावर्षीचा उत्पन्न दाखला मागणी करू नये याबाबत वरिष्ठांकडे विनंती करण्यात येणार आहे.-चंद्रकला शेळके, वरिष्ठ लिपिक, संजय गांधी निराधार योजना
योजनेचे फॉर्म येथील कार्यालयात साधे उपलब्ध होत नाहीत. त्यासाठी रस्त्यावरील झेरॉक्स दुकानात जाऊन दहा रुपये खर्च करून फॉर्म खरेदी केला. योजनेसाठी नातेवाईकांची मदत घेऊन ऑनलाईन प्रक्रिया करून सर्व कागदपत्रे जोडली. तरीही अपात्र ठरविले.





