गणेशभक्तांसाठी 50 कोटींचे विमा कवच

पुणे – पुणे मनपा, पिंपरी-चिंचवड मनपा यासह कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीअंतर्गत गणेशभक्तांसाठी तब्बल 50 कोटी रुपयांचा विमा श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे काढण्यात आला आहे. यामध्ये चेंगराचेंगरी, अतिरेकी हल्ला किंवा हवाई हल्ला झाल्यास विम्याचे सुरक्षाकवच मिळणार आहे. यामध्ये अपघाती मृत्यू झाल्यास प्रति व्यक्तीला 5 लाख रुपये, अपघातात अंशत: अपंगत्त्व आल्यास 2 लाख रुपये आणि अपघातात जखमी झालेल्या प्रत्येक व्यक्ती 50 हजार रुपयांपर्यंत औषधाचा खर्च देण्यात येईल. दिनांक 1 ते 13 सप्टेंबरपर्यंत ही विम्याची सुविधा असणार आहे.
याशिवाय गणपतीच्या कायमस्वरूपी उभारलेल्या मंदिरात येणाऱ्या भाविकांचा 5 कोटी रुपयांचा विमा उतरविण्यात आला आहे. यामध्ये अपघाती मृत्यू झाल्यास प्रति व्यक्तीला 2 लाख रुपये, अपघातात अंशत: अपंगत्व आल्यास 1 लाख रुपये, अपघातात जखमी झालेल्या प्रत्येक व्यक्तीला 50 हजार रुपयांपर्यंत औषधाचा खर्च देण्यात येईल. तर अतिरेकी हल्ला झाल्यास मंदिराच्या 1 किलोमीटरच्या परिसरातील दुकान किंवा घराचे नुकसान झाले तर हा विमा लागू होणार आहे.
गणेशाचे कायमस्वरुपी मंदिर आणि मंदिरापासून 1 किमीच्या परिसरातील फक्त भाविकांसाठीच हा विमा असेल. सुरक्षेच्या कारणास्तव देखाव्याच्या परिसरात सीसीटीव्ही, यासह फरासखाना चौक, बाबू गेनू गणपती, दगडूशेठ दत्तमंदिर, सिटीपोस्ट परिसरातही सीसीटीव्ही असतील. मंदिर परिसरातील कायमस्वरुपी कॅमेरांचा वॉच उत्सवावर असेल. त्यामुळे तब्बल 150 कॅमेरे, पोलीस प्रशासन आणि 200 पुरुष आणि महिलांची खासगी सुरक्षाव्यवस्था लक्ष ठेवणार आहे.





