खंडणीच्या आरोपात ५ मूळ भारतीयांना कॅनडात अटक

टोरांटो – कॅनडामध्ये खंडणी मागण्याच्या आरोपावरून ५ मूळ भारतीयांना अटक करण्यात आली आहे. अटक झालेल्यांमध्ये २ महिलांचाही समावेश आहे. या सर्वांवर खंडणी बरोबर शस्त्र बाळगण्याचे देखील आरोप आहेत.
ग्रेटर टोरांटो भागातील दक्षिण आशियाई उद्योगपतीकडे खंडणी मागण्याच्या आरोपाखाली पील रिजनल पोलीस एक्सटोर्शन इन्व्हेस्टिगेशन टास्क फोर्सने ओन्टारिओ प्रांतीय पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली. या संयुक्त मोहिमेंतर्गत राबवलेल्या शोधमोहिमेमध्ये ४ जणांना अटक करण्यात आली.
गगन अजित सिंग (२३), अनमोलदीप सिंग (२३), हशमीत कौर (२५), अयमजोत कौर (२१) आणि अरुणदीप थिंड (३९) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर इतर गुन्ह्यांसह खंडणी, अनाधिकृत बंदुक, अनधिकृत किंवा प्रतिबंधित शस्त्रे बाळगणे आणि फसवणूक असे आरोप ठेवण्यात आले असल्याचे पील प्रादेशिक पोलिसांनी बुधवारी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
पाचवा संशयित अरुणदीप थिंड याचा निश्चित पत्ता नाही आणि त्याच्यावर खंडणीचा आरोप आहे. कॅनडातील दक्षिण आशियाई उद्योजकांना खंडणीसाठी मिळत असलेल्या धमक्यांच्या तपासासाठी गेल्या वर्षी डिसेंबरपासून संयुक्त तपास सुरू करण्यात आला होता.
एकूण २९ प्रकरणांचा तपास सुरू असून खंडणीच्या प्रयत्नांसंदर्भात एकूण २४ आरोप ठेवण्यात आले आहेत. टोरोंटो स्टार वृत्तपत्रानुसार, त्यापैकी नऊ घटनांमध्ये, गोळीबार करण्यात आला.
मात्र, गोळीबारात कोणतीही दुखापत झाल्याचे वृत्त नाही, असे पोलीस अधिक्षक शेली थॉम्पसन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ज्यांना खंडणी मागण्यात आली होती, अशा उद्योजकांमध्ये रेस्टॉरंट मालक, ट्रक चालक-मालक, ट्रान्सपोर्ट कंपन्यांचे मालक आणिवापरलेल्या कारच्या खरेदी विक्री व्यवसायातील डिलरचा समावेश आहे, असेही त्यांनी सांगितले.





