बॉर्डर-गावसकर करंडक
* ऑस्ट्रेलिया सर्वबाद 480
* भारत दुसऱ्या दिवसअखेर बिनबाद 36
अहमदाबाद – उस्मान ख्वाजा व कॅमेरुन ग्रीन यांच्या दमदार खेळीनंतर तळात टॉड मर्फी व नाथन लॉयन यांनी केलेल्या उपयुक्त फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 480 धावांवर संपूष्टात आला. बॉर्डर-गावसकर करंडक चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील या चौथ्या व निर्णायक कसोटीत दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा यजमान भारतीय संघाने आपल्या पहिल्या डावात बिनबाद 36 अशी मजल मारली असून ते आता 444 धावांनी पिछाडीवर आहेत. खेळ थांबला तेव्हा शुभमन गिल 18 तर, कर्णधार रोहित शर्मा 17 खेळत आहेत.
तत्पूर्वी, गुरुवारच्या 4 बाद 255 धावांवरून पुढे खेळ सुरु झाल्यावर ख्वाजा व ग्रीन यांनी वेगाने धावा केल्या. नाबाद 104 धावांवरून पुढे खेळताना ख्वाजाने आक्रमक फलंदाजी करत भारतीय गोलंदाजांवर दडपण राखले. दुसरीकडे ग्रीननेही आपले अर्धशतक व पाठोपाठ शतकही साकार केले. या जोडीने भारताच्या वेगवान व फिरकी गोलंदाजांना एकही संधी दिली नाही. त्यांनी पहिल्यांदा संघाला त्रिशतकी पल्ला गाठून दिली. या जोडीने पाचव्या गड्यासाठी द्विशतकी भागीदारी केली.
लक्षवेधी…
– उस्मान ख्वाजाचे द्विशतक हुकले
– कॅमेरुन ग्रीनची शतकी खेळी
– रवीचंद्रन अश्विनचे 6 बळी
– नियमित कर्णधार पॅट कमिन्सला मातृशोक
– ऑस्ट्रेलियाचा काळी फीत लावून खेळ
– कमिन्सची एकदिवसीय मालिकेतूनही माघार
– चेतेश्वर पुजारा भारताचा उपकर्णधार होण्याचे संकेत
ग्रीनने आपले शतक थाटात साकार केले. 114 धावांच्या या खेळीत त्याने 170 चेंडूत 18 चौकार फटकावले. तो बाद झाला तेव्हा ख्वाजाने आपले दीडशतक पार केले. यावेळी ऍलेक्स कॅरी व मिशेल स्टार्क यांनी साफ निराशा केली. मग ख्वाजाने नाथन लियॉनच्या साथीत डाव सावरताना संघाला चारशे धावांचा पल्ला गाठून दिला. ख्वाजा द्विशतक साकार करणार असे वाटत असतानाच 180 धावांवर बाद झाला. त्याला अक्सर पटेलने पायचित केले. या खेळीत त्याने 422 चेंडूत 21 चौकार फटकावले. तो परतल्यावर टॉड मर्फीने लॉयनला सुरेख साथ देत संघाचा साडेचारशे धावांचा पल्लाही पार करुन दिली.
That will be Stumps on Day 2⃣ of the Fourth #INDvAUS Test!
Another gripping day of Test Cricket as #TeamIndia 🇮🇳 reach 36/0 at the end of day’s play!
We will be back with more action tomorrow as an exciting Day 3 awaits!
Scorecard ▶️ https://t.co/8DPghkwsO6…@mastercardindia pic.twitter.com/WZMm7tsN1U
— BCCI (@BCCI) March 10, 2023
मर्फीही अर्धशतक पूर्ण करु शकला नाही. अश्विनच्या फसक्या चेंडूवर तो 41 धावांवर पायचित झाला. त्याने या खेळीत 61 चेंडूत 5 चौकार फटकावले. यावेळी ऑस्ट्रेलियाला पाचशे धावा फलकावर लावण्याची संधी होती, मात्र, अश्विनने त्यांच्यावर वर्चस्व राखताना लॉयनला 34 धावांवर बाद करत त्यांचा डाव 480 धावांवर गुंडाळला. भारताकडून रवीचंद्रन अश्विनने 6 गडी बाद केले. महंमद शमीने 2 बळी घेतले. अक्सर पटेल व रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
अश्विनची अनोखी कामगिरी
भारताचा अनुभवी ऑफ स्पीन गोलंदाज रवीचंद्रन अश्विन याने एका एनोख्या कामगिरीची नोंद केली आहे. त्याने या सामन्यात सहा फलंदाज बाद करत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावसकर मालिकेत आतापर्यंत एकूण 111 बळी मिळवताना महान गोलंदाज अनील कुंबळेच्या कामगरीची बरोबरी केली आहे.
मोठे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने सावध खेळ केला. कर्णधार रोहित शर्माने शुभमन गिलच्या साथीत दिवसातील उर्वरीत 10 षटकांचा खेळ खेळून काढताना बिनबाद 36 धावा केल्या आहेत. खेळ थांबला तेव्हा गिल 18 तर रोहित 17 धावांवर खेळत आहेत. भारतीय संघ आता 444 धावांनी पिछाडीवर आहेसून सामन्याचे आता तिन दिवस बाकी असल्याने भारतीय संघाने तुल्यबळ लढत दिली तर सामना अनिर्णित राहू शकतो.
संक्षिप्त धावफलक –
ऑस्ट्रेलिया पहिला डाव – 167.2 षटकांत सर्वबाद 480 धावा. (उस्मान ख्वाजा 180, कॅमेरून ग्रीन 114, टॉड मर्फी 41, स्टीव्ह स्मिथ 38, नाथन लियॉन 34, ट्रॅव्हीस हेड 32, रवीचंद्रन अश्विन 6-91, महंमद शमी 2-134, अक्सर पटेल 1-47, रवींद्र जडेजा 1-89). भारत पहिला डाव – 10 षटकांत बिनबाद 36 धावा. (शुभमन गिल खेळत आहे 18, रोहित शर्मा खेळत आहे 17).