पुण्यात झाड कोसळून ४९ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; कर्वेनगर परिसरात दुर्घटना

पुणे : कर्वेनगर भागात झाड कोसळून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. राहुल नरहर जोशी (वय ४९, रा. नऱ्हे, सिंहगड रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. जोशी हे सोमवारी सायंकाळी दुचाकीवरुन कर्वेनगर भागातून घरी निघाले होते. जोशी यांचा संगणकविषयक साहित्य विक्रीचा व्यवसाय आहेत. अलंकार पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर असलेल्या झाडाची फांदी दुचाकीस्वार जोशी यांच्या अंगावर कोसळली.
अपघातात ते गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात जखमी झालेल्या जोशी यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती अलंकार पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीता रोकडे यांनी दिली.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. रस्त्यात पडलेल्या फांद्या हटवून जवानांनी रस्ता वाहतुकीस माेकळा केला. अपघातानंतर कर्वेनगर परिसरातील रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. दोन वर्षांपूर्वी शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराजवळ झाडाची फांदी पडून अभिजित गुंड या तरुणाचा मृत्यू झाला होता. गेल्या वर्षी बिबवेवाडी भागात झाडाची फांदी काेसळून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.





