Nagar | समिती अभावी वृद्ध कलावंतांचे 487 प्रस्ताव धूळखात

नगर, (प्रतिनिधी)- साहित्य, कला क्षेत्रात भरीव व दीर्घकाळ कामगिरी करणार्या साहित्यिक व कलावंतांची उतरत्या वयात उपासमार होऊ नये, यासाठी सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, क्रीडा, पर्यटन विशेष सहाय्यक विभागातर्फे राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक, कलावंत मानधन योजना राबवली जाते.
दरवर्षी जिल्ह्यातून 100 कलावंतांची निवड करण्यात येते. मात्र या वर्षा निवड समितीच अस्तित्वात नसल्याने गेल्या 10 महिन्यांपासून कलांवतांची निवड रखडली आहे. सध्या 487 निवडीचे प्रस्ताव धुळखात पडले आहे.
पालकमंत्र्यांकडून समिती सदस्यांची नियुक्ती करण्यात येते. पण त्यांच्याकडून नावेच निश्चित न झाल्याने ही समिती होईना.
जिल्हास्तरीय निवड समितीमार्फत निवडलेल्या कलावंतांच्या बँक खात्यात मानधन जमा केले जाते. या योजनेसाठी पात्र लाभार्थी दरवर्षी तालुकास्तरावर अर्ज सादर करतात.
तालुकास्तरावरून हे अर्ज समाजकल्याण विभागाकडे येतात. प्राप्त अर्जातून पात्र लाभार्थीची निवड जिल्हास्तरीय समिती करते. जिल्ह्यात सुमारे 1200 वृद्ध कलावंत आहे. त्यांना नियमित मानधन मिळत आहे.
मात्र नव्याने 100 कलावंत निवड या वर्षाची अद्याही झालेली नाही. गेल्या दहा महिन्यात जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागात 487 कलांवतांचे प्रस्ताव आले असून तालुकास्तरावर आणखी प्रस्ताव आहेत. ते निवडीच्या प्रतीक्षेत पडून आहेत.
कलावंतांना दर महिन्याला मानधन दिले जाते. यातून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निकाली निघण्यास मदत होते. मात्र मागील 10 महिन्यांपासून जिल्हास्तरीय निवड समितीच स्थापन झालेली नाही. त्यामुळे नवीन कलावंत निवडीची प्रक्रियाही थंडावली आहे.
करोनाच्या काळात मानधन मिळेल, अशी अपेक्षा कलावंतांना होती. मात्र जिल्हास्तरीय निवड समितीच स्थापन नसल्याने वृद्ध कलावंत,साहित्यिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
यासंदर्भात समाजकल्याण अधिकार्यांशी संपर्क साधला असता निवड समिती स्थापन करण्यासंदर्भात पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
असे मिळेल मानधन
राष्ट्रीय पातळीवर योगदान देणारे साहित्यिक, कलावंतांना पूर्वी दरमहा 1 हजार 400 रूपये मानधन मिळत होते. ते आता 2 हजार 750 रूपये रूपये मिळते.
राज्य पातळीवर योगदान देणार्या कलावंतांना पूर्वी 1 हजार 200 मानधन मिळत होते. आता 2 हजार 550 रूपये मिळतील. तसेच जिल्हास्तरावर योगदान देणार्या कलावंतांना 1 हजाराऐवजी 2 हजार 250 रूपये मानधन मिळणार आहे.




