Pune news : ‘लेखन हा व्यक्त होण्याचा प्रभावी मार्ग’; बालसाहित्य पाठविण्यासाठी अमरेंद्र भास्कर संस्थेचे आवाहन
पुणे – लेखन ही केवळ कलाच नाही तर विचारांची अभिव्यक्ती करण्याचे प्रभावी माध्यम आहे. विशेषतः लहानग्यांच्या मनातल्या भावना, कल्पना आणि स्वप्नांना शब्दरूप देण्यासाठी लेखन अत्यंत उपयुक्त ठरते. मुलांचे भावविश्व समजून घेण्यासाठी आणि त्यांच्या संवेदनशील मनाला योग्य दिशा देण्यासाठी दर्जेदार बालसाहित्य आवश्यक आहे.
याच उद्देशाने अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था दरवर्षी बालसाहित्य लेखनातील उत्कृष्ट साहित्यकृतींना पुरस्कार देत आहे. यामध्ये कथा, कविता, कादंबरी, एकांकिका, समीक्षा, नाटुकली, ललित लेखन अशा विविध साहित्यप्रकारांचा समावेश असतो.
संस्थेचे अध्यक्ष राजन लाखे आणि कार्यवाह डॉ. दिलीप गरुड यांनी यावर्षीही बालसाहित्य पाठविण्याचे आवाहन केले आहे. १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या साहित्यकृतीच या स्पर्धेसाठी ग्राह्य धरल्या जातील.
मराठी भाषेत लिहिणाऱ्या सर्व बालसाहित्यकारांसाठी ही एक मोठी संधी आहे. बालवाचकांसाठी आकर्षक, विचारप्रवर्तक आणि संस्कारक्षम साहित्य निर्माण करणाऱ्या लेखकांनी आपले साहित्य खालील पत्त्यावर पाठवावे.
साहित्य पाठविण्याची अंतिम तारीख : १० मे २०२५
पत्ता : १४३९, शुक्रवार पेठ, महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रचार समिती कार्यालय, पुणे – ४११००२





