“शनवार वाडा’ हे चूक “शनिवार वाडा’ असे म्हणा
पुणे, ता. 20 – इतिहास प्रसिद्ध शनिवार वाड्यावर “शनवार वाडा’ अशी जी पाटी होती, ती दोन-तीन दिवसांपूर्वी शुद्ध करण्यात आली व “शनिवार वाडा’ असे आता तीवर लिहिण्यात आले आहे. 1729 साली या वाड्याचे बांधकाम सुरू झाले. सुरुवातीला तो “श्रीमंतांचा वाडा’ म्हणून ओळखला जात असे. 1761 नंतर तो “शनिवार वाडा’ म्हणून ओळखला जाऊ लागला.
बोली भाषेत लोक “शनवार वाडा’ म्हणू लागले. ऐतिहासिक कागदपत्रांतदेखील “शनवार वाडा’ व “शनिवार वाडा’ असे दोनही उल्लेख आहेत. दोन महिन्यांपूर्वी माजी महापौर निळूभाऊ लिमये यांनी पाटीवरील नावाची अशुद्धता पुराणवस्तू खात्याच्या लक्षात आणून दिली. नंतर शनिवार वाडा असे नाव देण्यास औरंगाबाद येथील पुराणवस्तू संशोधन केंद्राची मान्यता घेण्यात आली व अखेर आता हे नाव “शुद्ध’ करण्यात आले आहे.
कुटुंबनियोजन कार्यक्रमामुळे 1.3 कोटी जन्म टाळण्यात यश
नवी दिल्ली – आतापर्यंत कुटुंबनियोजनामुळे भारतात 1.3 कोटी बालकांचे जन्म टाळता आले. लोकसंख्या व साधनसामग्री यात समन्वय साधण्याच्या दृष्टीने कुटुंबनियोजन हा या देशातील सामाजिक व आर्थिक विकासाचा अविभाज्य भाग आहे.
आरोग्य व कुटुंबनियोजन खात्याचे केंद्रीय मंत्री रघुनाथराव खाडिलकर यांनी वरील मत व्यक्त केले. प्लेग भारतातून अदृश्य झाल्याचे सांगून ते म्हणाले की, मलेरियाचाही प्रादुर्भाव नाममात्र आहे. सामूहिक पाणीपुरवठा व चांगले सामूहिक आरोग्य राखणे या बाबींना प्राधान्य देण्यात येत आहे.
वहिदा रहमानचा विवाह ठरला
नवी दिल्ली – सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री वहिदा रहमान हिचा विवाह उत्तरप्रदेशातील नजीयाबादचे फरीद अहमद सिद्दीकी यांचेबरोबर ठरला आहे. वहिदा यांचे वय 34 आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यात हा विवाह होईल.