पुणे | अकरावी प्रवेशाच्या ४८ हजार जागा रिक्तच

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावीसाठी आत्तापर्यंत ७२ हजार १७४ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले असून अद्यापही ४८ हजार ४७१ एवढया प्रवेशाच्या जागा रिक्तच पडल्या आहेत. या रिक्त जागांसाठी तिसरी विशेष फेरी सुरु करण्यात आलेली आहे.
अकरावी प्रवेशासाठी १ लाख २ हजार ४८८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. ३४३ कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेशासाठी एकुण १ लाख २० हजार ६४५ जागा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या.
त्यात केंद्रीय प्रवेशाअंतर्गत १ लाख ३ हजार ३१५ तर कोटाअंतर्गत १७ हजार ३३० जागांचा समावेश आहे. आत्तापर्यंत तीन नियमित प्रवेश फेरी, दोन विशेष फेरीत केंद्रीय प्रवेशाअंतर्गत ३९ हजार५८९ तर कोटाअंतर्गत ८ हजार ८८२ जागांवर प्रवेश झालेला आहे.
अकरावी प्रवेश : तिसरी विशेष फेरीचे वेळापत्रक
१७ ते १९ अॉगस्ट – प्रवेशासाठी अर्जाचा भाग-२ भरुन कनिष्ठ महाविद्यालयांची पंसतीक्रम नोंदविणे, नवीन विद्यार्थ्यांची अॉनलाईन नोंदणी करुन अर्जाचा भाग -१ भरुन तो प्रमाणित करणे, अर्जाच्या भाग-१ मध्ये दुरुस्ती करणे, पंसती अर्ज लॉक करणे बंधनकारक.
२० ते २१ अॉगस्ट – डेटा प्रोसेसिंग करणे, पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करणे व त्याची तपासणी करणे.
२१ अॉगस्ट – गुणवत्ता यादी जाहीर करणे, विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी कनिष्ठ महाविद्यालयांची निवड यादी पोर्टलवर दर्शविणे, संबंधित महाविद्यालय प्रवेशासाठी मिळालेल्या विद्यार्थ्यांची यादी कॉलेज लॉगिनमध्ये दर्शविणे.
२२ ते २३ अॉगस्ट – कॉलेज लॉगीन मध्ये प्रवेश निश्चित करणे, प्रवेश रद्द करणे व नाकारणी ही प्रक्रिया करणे, प्रथम पसंतीक्रम मिळूनही प्रवेश नाकारला गेला अथवा प्रवेश रद्द केल्यास अशा विद्यार्थ्यांना पुढील फेरीमध्ये प्रतिबंधित केले जाणार नाही, पुढील फेरीसाठी नवीन विद्यार्थी नोंदणी व अर्ज भाग-१ भरणे सुरु राहील.
२३ अॉगस्ट – प्रवेशित विद्यार्थ्यांची स्थिती महाविद्यालयांनी पोर्टलवर नोंदविणे, फेरी अखेरच्या रिक्त जागा जाहीर करणे.





