Direct Tax Collection: प्रत्यक्ष कर संकलनात 48 टक्के वाढ

नवी दिल्ली – एप्रील 2021 ते मार्च 2022 या आर्थिक वर्षात करोना व्हायरसने बराच धुमाकूळ घातला असला तरी कर संकलनात मात्र भरीव वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे. लवकरच संपणाऱ्या या वर्षामध्ये प्रत्यक्ष कर संकलन 48 टक्क्यांनी वाढले आहे. तर आगाऊ कर भरणा 41 टक्क्यांनी वाढला आहे. 16 मार्चपर्यंत एकूण प्रत्यक्ष कर संकलन 13.63 लाख कोटी रुपये इतके झाले आहे. गेल्या वर्षी या तारखेपर्यंत केवळ 9.16 लाख कोटी रुपयाचे प्रत्यक्ष कर संकलन झाले होते.
प्रत्यक्ष करांमध्ये प्राप्तिकर, कंपनी कर, मालमत्ता कर, भेटवस्तू कर या करांचा समावेश असतो. सरलेल्या वर्षांमध्ये आगाऊ कर भरण्यामध्ये मोठी वाढ झाली आहे. 15 मार्चपर्यंत आगाऊ कर भरण्यातून 6.62 लाख कोटी रुपये जमा झाले आहेत. यापूर्वीच्या वर्षाच्या तुलनेत यामध्ये 41 टक्क्यांची वाढ झाली आहे.
या वर्षामध्ये कर विभागाने करदात्यांना 1.87 लाख कोटी रुपयाचा परतावा दिला आहे. एकूण प्रत्यक्ष कर संकलनात कंपनी कराचा वाटा 53 टक्के, वैयक्तिक प्राप्ती कराचा वाटा 47 टक्के आहे. यामध्ये रोखे व्यापारावरील कराचा समावेश आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या यापूर्वीच्या वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये प्रत्यक्ष करातून 11.30 लाख कोटी रुपये जमा होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात कर संकलन त्यापेक्षा कितीतरी जास्त झाले आहे.
विशेष म्हणजे सरलेल्या वर्षांमध्ये करोना व्हायरसच्या दोन लाटा येऊन गेल्या आहेत. आता असा काही प्रकार होणार नसल्यामुळे यावर्षी कर संकलनात त्यापेक्षा जास्त प्रमाणात वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या वर्षात झालेल्या अप्रत्यक्ष कर संकलनाची आकडेवारी लवकरच जाहीर होणार आहे.
अप्रत्यक्ष कर संकलनात अपेक्षेपेक्षा फार मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. कारण इंधनावर मोठ्या प्रमाणात कर आकारण्यात आलेला होता. गेल्या काही महिन्यापासून जीएसटी कर संकलन दर महिन्याला एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होत आहे. त्यामुळे या आघाडीवर अर्थमंत्रालय पूर्णपणे यशस्वी झाले असल्याची परिस्थिती आहे.





