भारताच्या अंतर्गत बाबतीत रशिया हस्तक्षेप करीत आहे
नवी दिल्ली, दि. 18 – रशिया भारताच्या अंतर्गत बाबतीत हेरगिरी करीत असल्याचा जोरदार आरोप विरोधकांनी आज राज्यसभेत केला. पण संरक्षणमंत्री स्वर्णसिंग यांनी त्याचा इन्कार केला. रशिया भारताला मिग विमानाची सुधारित आवृत्ती आणि सुटे भाग देत नसल्याच्या विरोधकांच्या आरोपाचाही स्वर्णसिंगांनी इन्कार केला. राजकीय पक्षांच्या बैठकीत विदेशी लोकही भाग घेतात. ही नेहमीचीच पद्धत आहे, असे स्वर्णसिंग यावेळी म्हणाले.
सभापतींच्या दृष्टीने खासदार लिंगभेदरहित
नवी दिल्ली – लोकसभेच्या सदस्यांना माझ्या दृष्टीने स्त्री-पुरुष भेद नाही, असे उद्गार सभापती धिल्ला यांनी काढले. तसेच माझ्या दृष्टीने सर्व सदस्य सभ्य गृहस्थ आहेत, असेही सभापती महोदय म्हणाले.
आमदाराच्या खोलीपुढे पोलीस ठेवू नये
मुंबई – अपक्ष आमदार खानोलकर यांच्या आमदार निवासातील खोलीसमोर पोलीस न ठेवण्याचा आदेश विधानपरिषदेचे अध्यक्ष पागे यांनी सरकारला दिला. या शिपायामुळे आपणाला अटक केल्यासारखेच वाटत असल्याचे सांगून आमदार खानोलकर यांनी हक्कभंग प्रस्ताव मांडला होता. पण पागेंनी त्याला परवानगी दिली नाही. आमदार निवासातील पोलीस वाढले असल्याची तक्रार आमदार प्रधान, प्रमिला टोपले यांनी केली.
भ्रष्टाचारी मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत
त्रिवेंद्रम – आज येथे सचिवालयावर सुमारे 5 हजार लोकांचा मोर्चा येऊन निदर्शने झाली. पाच विरोधी पक्षांच्या संयुक्त कृती समितीतर्फे झालेल्या या निदर्शनात भ्रष्टाचारी मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत, ही मागणी करण्यात आली.