Pune District : 17 गुन्ह्यांतील 45 लाखांचा मुद्देमाल नागरिकांना परत

लोणी काळभोर : दरोडा, घरफोडी, चोरी यासारख्या गंभीर गुन्ह्यांचा तपास लावून लोणी काळभोर पोलिसांनी 17 गुन्ह्यांतील तब्बल 45 लाखांहून अधिक रुपयांचा जप्त केलेला मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशाने नागरिकांना देण्यात आला. त्यामुळे नागरिकांच्या चेहर्यावर आनंद दिसून येत होता. नागरिकांनी पोलीस प्रशासनाच्या कामगिरीचे भरभरून कौतुक करून आभार मानले आहेत.
महाराष्ट्र पोलीस दलाचा 2 जानेवारी हा स्थापना दिवस आहे. या दिवसाचे औचित्य साधून सप्ताहामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन हा दिवस मोठ्या उत्साहाने महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे. परिमंडळ 5च्या कार्यक्षेत्रातील मुद्देमाल वितरण समारंभ वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवनात आज सायंकाळी सहा वाजता पार पडला. यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्ह्यात जप्त केलेला मुद्देमाल संबंधित फिर्यादींना परत केला. यावेळी पुणे शहर पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त प्रविण पाटील, शैलेश बलकवडे, मनोज पाटील, परिमंडळ 5 चे उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे व पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.
लोणी काळभोर पोलिसांनी मोठ्या शिताफीने कारवाई करून 17 गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये 7 गुन्ह्यांमधील चालू बाजारभावा प्रमाणे 19 लाख 21 हजार रुपये किंमतीचे सोने, तर 10 गुन्ह्यातील 26 लाख 40 हजार रुपये किंमतीची 10 वाहने यामध्ये पिकअप, रिक्षा, बल्कर व दुचाकी यांचा समावेश असून सुमारे 45 लाख 61 हजार रुपयांचा मुद्देमाल नागरिकांना परत करण्यात आला आहे. यावेळी नागरिकांच्या चेहर्यावर आनंद दिसून येत होते.
नागरिकांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानले. यावेळी आपणही पोलीस दलाच्या माध्यमातून चोख कर्तव्य बजावीत असून नागरिकांची सेवा करीत आहोत असे पोलीस बांधवांच्या चेहर्यावरील समाधानामुळे स्पष्ट दिसून येत होते. यावेळी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट, पोलीस उपनिरीक्षक योगेश पैठणे, हवालदार निशा कोंढे, महेश चव्हाण, संदीप जोगदंड, प्रशांत कळसकर, रामदास मेमाणे, रवी आहेर उपस्थित होते.
न्यायालयाच्या आदेशानुसार दिला मुद्देमाल
या समारंभामध्ये परिमंडळ 5 मधील एकूण 9 पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांमधील 80 फिर्यादींचा 1 कोटी 76 लाख 67 हजार 302 रुपयांचा (दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहने, मोबाईल फोन, सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम) मुद्देमाल जमा आहे. हा मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित फिर्यादींना परत करण्यात आला आहे.





