Ayodhya Donation Theft Case : 45 दिवसांचं CCTV अन्…; राम मंदिर दानअपहार प्रकरणात आरोपीचा धक्कादायक कबुलीजबाब! सगळचं सांगितलं….
Ayodhya Donation Theft Case : ज्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती खूप मोठी असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात एकूण आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

Ayodhya Donation Theft Case : अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिरातील दानचोरी प्रकरणामुळे देशभरात मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. तसेच त्याने पोलीस चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. ज्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती खूप मोठी असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात एकूण आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या ४५ दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज आरोपी अविनाश शुक्ला याला दाखवण्यात आले. त्यावेळी त्याने आपला गुन्हा केल्याची कबुली दिली. चौकशीत अविनाशने सांगितले की, चोरीच्या पैशांतून त्याने ब्रेझा कार खरेदी केली, गावात घर बांधले आणि भावालाही मोठी रक्कम दिली. संशय येऊ नये म्हणून कार स्वतःच्या नावावर न घेता सरकारी शिक्षक असलेल्या भाऊ अभिषेकच्या नावावर खरेदी केल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले.
सीसीटीव्ही फुटेजसोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न
तपासात आणखी एक महत्त्वाचा खुलासा म्हणजे आरोपींनी सीसीटीव्ही यंत्रणेशी छेडछाड केल्याचा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, चोरीचा पुरावा नष्ट करण्यासाठी कंट्रोल रूममध्ये जाऊन सीसीटीव्ही फुटेज डिलीट करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. काही वेळा फुटेज हटवण्यात यश आले असले, तरी पोलिसांनी तपासासाठी आवश्यक असलेले महत्त्वाचे फुटेज सुरक्षित केल्याचा दावा केला आहे.
अविनाशच्या जबाबानुसार, टिन्नू आणि सुभाष यांच्या मदतीमुळे त्याला पकडले जाणार नाही, असा विश्वास त्याला होता. टिन्नूकडे देखरेखीची जबाबदारी असल्याने कोणताही सुरक्षा रक्षक त्याला अडवत नव्हता. शिवाय, “काहीही होणार नाही, सीसीटीव्ही फुटेज डिलीट करू,” असे टिन्नू नेहमी सांगत असल्याचा दावाही अविनाशने केला आहे.
प्रकरण अघड होण्यापूर्वी आरोपींची एक महत्त्वाची बैठक
पोलिसांच्या तपासात असेही समोर आले आहे की, चोरीनंतर सर्व आरोपी नियमितपणे १४ कोसी परिक्रमा मार्गावरील एका निर्जन ठिकाणी भेटत असत. या बैठकींना अनुकल्प मिश्रा, लवकुश मिश्रा, रामाशंकर मिश्रा यांच्यासह इतर आरोपी उपस्थित राहत होते. मे महिन्याच्या अखेरीस प्रकरण उघड होण्यापूर्वीही आरोपींची एक महत्त्वाची बैठक झाल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू
सध्या पोलीस सीसीटीव्ही फुटेज, आर्थिक व्यवहार, मालमत्तेची खरेदी आणि आरोपींमधील आर्थिक देवाणघेवाणीचा तपशील तपासत आहेत. तसेच चोरीच्या पैशांचे वितरण आणि या संपूर्ण रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग होता का, याचाही सखोल तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे या दानचोरी प्रकरणात पुढे कोणत्या धक्कादायक बाबी समोर येतात याकडे देशाचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा : Mithila Palkar: ‘‘नाही’ म्हणजे नाहीच! लैंगिक शिक्षणावर बोलणं ही मोठी जबाबदारी; मिथिला पालकरचं स्पष्ट मत’





