Mithila Palkar: ‘‘नाही’ म्हणजे नाहीच! लैंगिक शिक्षणावर बोलणं ही मोठी जबाबदारी; मिथिला पालकरचं स्पष्ट मत’
Mithila Palkar मिथिलाने सांगितले की, अनेकांना लैंगिक शिक्षण म्हणजे फक्त शरीराशी संबंधित माहिती असे वाटते. प्रत्यक्षात हा विषय त्यापेक्षा खूप व्यापक आहे. संमती, वैयक्तिक मर्यादा, एकमेकांच्या भावनांचा आदर आणि योग्य संवाद यासारख्या अनेक गोष्टी लैंगिक शिक्षणाचा महत्त्वाचा भाग आहेत.

Mithila Palkar: अभिनेत्री मिथिला पालकर (Mithila Palkar) सध्या तिच्या ‘सुपर सुब्बू’ या नव्या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. ही मालिका लैंगिक शिक्षण (Sex Education), संमती (Consent) आणि वैयक्तिक मर्यादा यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर भाष्य करते. या मालिकेबद्दल बोलताना मिथिलाने अशा संवेदनशील विषयांवर पडद्यावर बोलताना कलाकार आणि निर्मात्यांची मोठी जबाबदारी असल्याचे सांगितले.
एका मुलाखतीत मिथिलाने सांगितले की, लैंगिक शिक्षण हा आपल्या समाजात अजूनही संकोचाने पाहिला जाणारा विषय आहे. त्यामुळे अशा विषयावर काम करताना तो अत्यंत संवेदनशीलपणे मांडणे गरजेचे असते. ‘सुपर सुब्बू’ची कथा आणि पटकथा वाचल्यानंतर हा विषय ज्या पद्धतीने हाताळला आहे, ते पाहून आपण प्रभावित झालो आणि या मालिकेचा भाग होण्याचा निर्णय घेतला, असे ती म्हणाली.
तिच्या मते, गंभीर विषयांवर विनोदाच्या माध्यमातून बोलणे सोपे नसते. मात्र या मालिकेत विनोदाचा वापर करताना कोणत्याही विषयाची किंवा व्यक्तीची खिल्ली उडवलेली नाही. उलट हलक्या-फुलक्या शैलीत प्रेक्षकांपर्यंत अत्यंत महत्त्वाचे संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे प्रेक्षकांचे मनोरंजनही होते आणि त्याचवेळी विचार करायलाही भाग पाडले जाते. (Mithila Palkar)

Mithila Palkar: ‘‘नाही’ म्हणजे नाहीच! लैंगिक शिक्षणावर बोलणं ही मोठी जबाबदारी; मिथिला पालकरचं स्पष्ट मत’
मिथिलाने सांगितले की, अनेकांना लैंगिक शिक्षण म्हणजे फक्त शरीराशी संबंधित माहिती असे वाटते. प्रत्यक्षात हा विषय त्यापेक्षा खूप व्यापक आहे. संमती, वैयक्तिक मर्यादा, एकमेकांच्या भावनांचा आदर आणि योग्य संवाद यासारख्या अनेक गोष्टी लैंगिक शिक्षणाचा महत्त्वाचा भाग आहेत. या मालिकेत अशाच अनेक मुद्द्यांवर सहज आणि नैसर्गिक पद्धतीने चर्चा करण्यात आली आहे. (Mithila Palkar)
संमतीबद्दल बोलताना मिथिला म्हणाली की, ‘नाही म्हणजे नाही’ हा नियम फक्त प्रेमसंबंध किंवा लैंगिक संबंधांसाठीच नाही, तर आयुष्यातील प्रत्येक गोष्टीसाठी लागू होतो. एखाद्या व्यक्तीला कोणतीही गोष्ट करायची नसेल, तर तिच्या निर्णयाचा आदर करणे आवश्यक आहे. कोणाच्याही इच्छेविरुद्ध वागणे योग्य नाही. हा संदेश समाजात अधिक ठामपणे पोहोचण्याची गरज असल्याचे तिने सांगितले. (Mithila Palkar)
आजही अनेकांना ‘नाही म्हणजे नाही’ ही साधी गोष्ट स्वीकारणे कठीण का जाते, याबाबत विचारले असता मिथिलाने समाजातील अनेक वर्षांपासूनची मानसिकता आणि संस्कार याकडे लक्ष वेधले. तिच्या मते, अनेक चित्रपट, मालिका आणि सामाजिक वातावरणात वर्षानुवर्षे ‘तिने नाही म्हटलं तरी तिच्या नाहीमध्ये होकार असतो’ अशी चुकीची धारणा दाखवली गेली. त्यामुळे अनेकांच्या मनात ही विचारसरणी रुजली आहे. (Mithila Palkar)
ती पुढे म्हणाली की, इतक्या वर्षांपासून तयार झालेली मानसिकता एका दिवसात बदलू शकत नाही. लोकांच्या विचारांमध्ये बदल घडण्यासाठी वेळ लागेल. मात्र अशा विषयांवर सातत्याने संवाद होत राहिला, योग्य माहिती दिली गेली आणि संमतीचे महत्त्व समजावून सांगितले गेले, तर हळूहळू समाजात सकारात्मक बदल दिसून येईल.
‘सुपर सुब्बू’ ही तेलुगू भाषेतील मोजक्या मालिकांपैकी एक आहे, जी विनोदी शैलीतून लैंगिक शिक्षण आणि संमतीसारखे गंभीर विषय मांडते. या मालिकेत संदीप किशन, मुरली शर्मा आणि मिथिला पालकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. २ जुलैपासून ही मालिका नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली असून प्रेक्षकांकडून तिचे कौतुक होत आहे.





