आदित्य ठाकरे आणि रिया चक्रवर्ती यांच्यात 44 वेळा फोन कॉल? दिशाच्या वडिलांनी याचिकेत नेमकं काय म्हटलंय?

मुंबई : दिशा सालियनची सामूहिक बलात्कार करून निघृण हत्या केल्याचा आरोप करत एनआयएमार्फत चौकशीचे आदेश द्या, अशी मागणी करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. दिशाचे वडील सतीश सालियन यांनी ही याचिका दाखल केली आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे, अभिनेता सूरज पांचोली, दिनो मोरीयो यांच्यासह मुंबई पोलिसांवर या याचिकेतून गंभीर आरोप करण्यात आले आहेत.सुशांतसिंग राजपूतचा मृत्यू झाला त्यादरम्यान आदित्य ठाकरे आणि रिया चक्रवर्ती यांच्यात 44 वेळा फोनवर काय बोलणे झाले? असा सवाल याचिकेतून विचारण्यात आला आहे.
इतकेच नाही तर सुशांत आणि रियाच्या मृत्यूवर सवाल उठवणाऱ्या सर्व साक्षी पुराव्यांची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी देखील या याचिकेत करण्यात आली आहे. तसेच 13 आणि 14 जून 2020 रोजीचे सुशांतसिंह राजपूत, रिया चक्रवर्ती, आदित्य ठाकरे, अरबाज खान, संदिप सिंह, शौविक चक्रवर्ती यासर्वांचेही मोबाईल लोकेशन तपासले जावेत. तसेच या दोन्ही दिवसांचे आसपासच्या परिसरातील आदित्य ठाकरेंशी संबंधित सीसीटिव्ही फुटेज तपासले जावे, अशी मागणी वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेतून करण्यात आली आहे.
8 जून 2020 ला दिशाच्या मालाडमधील घरी पार्टी आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी दिशाच्या पार्टीत आदित्य ठाकरेही पोहोचले होते, असा आरोप करण्यात आला आहे. दिशाच्या मृत्यूनंतर आदित्य ठाकरेंकडून पोलिसांना अनेक फोन करण्यात आले. तसेच प्रत्यक्षदर्शींना धमकावण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. सीबीआय अधिकाऱ्यांनी ही आत्महत्या असल्याचा निष्कर्ष काढला. यावेळी मुंबई पोलीस आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशाभूल करत आपल्यावर दबाव टाकला. त्यांनी आपल्याला नजरकैदेत ठेवत मांडलेले पुरावे खरे मानण्यास भाग पाडल्याचा आरोप दिशाच्या वडिलांनी याचिकेतून केला आहे.
दिशा सालियन प्रकरण काय?
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपुतची मॅनेजर म्हणून काम केलेल्या दिशा सालियनच्या मृत्य सुशांतच्या मृत्यूच्या काही दिवस आधीच झाला होता. 28 वर्षीय दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपुतच्या मृत्यूमध्ये केवळ पाच दिवसांचे अंतर होते. 8 आणि 9 जून 2020 च्या रात्री दोन वाजण्याच्या सुमारास दिशाचा एका इमारतीच्या 14 व्या मजल्यावरुन पडल्याने मृत्यू झाला. त्यानंतर पाच दिवसांनी म्हणजे 14 जून 2020 रोजी सुशांत सिंह राजपूतने आपल्या राहत्या घरामध्ये मृतावस्थेत आढळून आला होता. या दोघांच्या मृत्यूचा संदर्भ अनेकांनी जोडला. दिशाच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी तिच्या मृतदेहाचा पोस्टमॉर्टम करण्यात आला. तिच्या पोस्टमॉर्टमसाठी वेळ जाणूनबुजून लावण्यात आला का असा सवालही उपस्थित करण्यात आला.
आदित्य ठाकरेंचे काय कनेक्शन?
8 जून 2020 ला दिशाच्या मालाडमधील घरी पार्टी सुरु होती. या पार्टीत दिशाचा होणारा नवरा रोहन राय आणि जवळची मंडळी उपस्थित होती. थोड्याच वेळात अचानक या ठिकाणी आलेल्या हायप्रोफाईल व्यक्तींमुळे वातावरण बदलले, असे बोलले जात आहे. या हायप्रोफाईल व्यक्तींमध्ये तत्कालिनमंत्री आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनो मोरिया यांचा समावेश होता असे सांगितले जात आहे. दिशा सालियनवर अमानुष सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षदर्शींच्या साक्षीतून समोर आल्या आहेत. दिशाचे तोंड बंद करण्यासाठी तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.




