nagar | साईबाबांच्या झोळीत ४३ लाखांचा सोन्याचा मुकुट

शिर्डी, (प्रतिनिधी) – श्री साईबाबांवर देश-विदेशातील लाखो भाविकांची श्रद्धा असल्याने भाविक साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात. रविवारी सकाळी एका साईभक्ताने साईचरणी ६४८ ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकुट अर्पण केल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
या सोनेरी मुकुटाची किंमत ४२ लाख ८० हजार रुपये असून, रविवारी सकाळी शिर्डी माझे पंढरपूर या आरतीला हा सुंदर नक्षिकाम असलेला सुवर्णजडीत मुकुट साईबाबांच्या मूर्तीवर चढवण्यात आला. मूर्तीवर चढवलेला हा मुकुट अतिशय सुंदर असून दानशूर साईभक्ताने संस्थानला आपले नाव जाहीर न करण्याची विनंती केली होती.
भाविकाच्या विनंतीचा मान ठेवत देणगीदार भाविकाचे नाव गुप्त ठेवण्यात आले. आपल्या श्रद्धेपोटी साईबाबांना अनेक भाविक गुप्तदान करत असतात. सहा महिन्यात सोन्याचे दान करणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असून दिवसेंदिवस यात वाढ होताना दिसत आहे.
दानशूर भाविकांना योग्य तो मानसन्मान, सुविधा देण्यासाठी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या असून, दानशूर भक्तांमध्ये समाधानाचे वातावरण बघावयास मिळत आहे.





