Kolhapur : कोल्हापूर परिसरातून तब्बल ४१ किलो गांजा जप्त; ८ पोलिसांच्या ताब्यात

Kolhapur – ओडिशातून आणलेल्या गांजाची कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांत होलसेल विक्री करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला.
दक्षिण महाराष्ट्रात सक्रिय असलेल्या टोळीतील आठ जणांना रविवारी उशीरा अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ४१ किलो १९५ ग्रॅम गांजासह तस्करीसाठी वापरलेल्या २ कार, १ दुचाकी आणि ९ मोबाइलसह गांजा असा सुमारे ३० लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
दीपक पुजारी (वय ३७), विवेक शिंदे (२८), अंकुश शिंदे (३०), नंदकिशोर भिकू साठे (३०), मनोज गोसावी (२९), राजू शेख (३०,), महेश साळुंखे (३२) आणि देवदास तुपे (२१) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हातकणंगले ते कुंभोज मार्गावर काही तरुण गांजाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती.
त्यानुसार नेज येथे सापळा रचून दीपक पुजारी, विवेक शिंदे, अंकुश शिंदे आणि नंदकिशोर साठे यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडील २१ किलो ७० ग्रॅम गांजा, एक कार, एक दुचाकी आणि पाच मोबाइल असा १६ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
अधिक चौकशीत त्यांनी सांगली जिल्ह्यातील खरसुंडी येथून गांजा विकत आणल्याचे सांगितले. पोलिसांनी खरसुंडी येथून महेश साळुंखे याला अटक करून चौकशी केली असता सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील पुरवठादारांची नावे समोर आली. त्यानुसार पोलिसांनी आणखी तिघांना अटक करून २० किलो १२५ ग्रॅम गांजा, एक कार आणि पाच मोबाइल असा १४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.





