४० वर्षे रखडलेली समस्या ४ वर्षांत सोडविली – सुनील कांबळे

पुणे – पुणे- सोलापूर रेल्वे मार्गामुळे गेली ४ दशके वाहतूक कोंडीच्या गर्तेत अडकलेल्या घोरपडी गावातील नागरिकांच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न कॅन्टोंन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून अवघ्या चार वर्षांत सोडविण्यात यश मिळाले असून, महापालिकेच्या पुढाकारातून या मार्गावर मागील वर्षी उड्डाणपूल उभारल्याने ही समस्या कायमची सुटल्याचा दावा महायुतीचे कॅन्टोंन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे यांनी केला.
कांबळे यांच्या प्रचारार्थ घोरपडी गावातील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच घेण्यात आली. या वेळी आपल्या पाच वर्षांतील कामांची माहिती त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिली.
कांबळे म्हणाले, की मार्गावर दिवसभरात सुमारे १०४ रेल्वेगाड्यांची वर्दळ आहे. परिणामी ५ तास हा मार्ग बंद ठेवावा लागत असल्याने मोठी वाहतूक कोंडी होत होती. महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष असताना या पुलासाठी निधी प्रस्तावित केला. मात्र, हा भाग लष्कराच्या हद्दीत असल्याने केंद्रशासन, तसेच राज्य शासनाच्या वेगवेगळ्या परवाग्यांची आवश्यक असल्यामुळे त्याचा सातत्याने पाठपुरावा केला, तर कोरोनाच्या कालावधीत दोन वर्षे हे काम मागे पडले. मात्र, अखेर मार्च २०२३ मध्ये हा पूल पूर्ण झाल्यानंतर हा भाग आता कोंडीमुक्त झाला आहे.
त्यामुळे घोरपडीगावासह पुणे आणि कॅम्प परिसरातील रहिवाशांसह मुंढवा-केशवनगर-खराडी परिसरातील नागरिकांची दैनंदिन वाहतूक कोंडीतून मुक्तता झाली आहे. विशेष म्हणजे महापालिकेसह राज्य आणि केंद्र शासनाकडून या पुलासाठी निधी मिळविण्यासाठी विशेष प्रयत्न केले असल्याचेही सांगून मिरज मार्गावरील पुलाचे कामही लवकरच पूर्ण होणार असल्याचा विश्वासही त्यांनी या वेळी बोलताना व्यक्त केला.





