पुणे | अभियंता तरुणीची ४० लाखांची फसवणूक

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शॉदी डॉट कॉमवरून लग्नाच्या आमिषाने पुण्यातील एका आयटी अभियंता तरुणीची ४० लाख ५० हजारांची सायबर चोरट्यांनी फसवणूक केली आहे. याप्रकरणी केशवनगर मुंढवा येथील 33 वर्षीय तरुणीने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार राजेश शर्मा, बँक खातेधारक व्यक्तींच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी तरुणी खराडी परिसरातील एका नामांकित आयटी कंपनीत नोकरी करते. विवाहसाठी तिने शादी डॉट कॉम या संकेतस्थळावर नोंदणी केली होती. तेथे राजेश शर्मा नावाच्या व्यक्तीसोबत तिचा परिचय झाला. पुढे दोघांचे बोलणे सुरू झाले. शर्मा याने तरुणीला तो विदेशात असल्याचे सांगितले.
पुढे संपर्क वाढत गेल्यानंतर शर्मा आणि तरुणी व्हिडिओ कॉलद्वारे बोलत होते. एके दिवशी शर्मा याने भारतात येऊन लग्न करायचे आहे, तसेच घर खरेदी करून व्यवसाय करायचा आहे, असे सांगितले. तरुणीला विश्वास वाटावा म्हणून त्याने प्रवासाची विमान तिकिटे खरेदी केल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने तो दिल्ली विमानतळावर पोहोचला असून, मॉनिटरींग फंड, सेंट्रल ब्युरो ऑफ इनव्हेस्टिगेशन, करन्सी कन्व्हर्जनसाठी पैसे पाहिजेत, असे सांगितले.
तरुणीने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवत वेळोवेळी त्याने सांगितलेल्या बँक खात्यावर तब्बल ४० लाख ५० हजार रुपये पाठवले. मात्र, काही दिवसांतच तरुणीला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानुसार तिने मुंढवा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पुढील तपास मुंढवा पोलिस करीत आहेत.




