दहशतवादी हल्ल्यात लष्कराचे ४ जवान शहीद; जम्मू-काश्मीरच्या कठुआमधील घटना

जम्मू – लष्करी वाहनांच्या ताफ्याला लक्ष्य करून दहशतवाद्यांनी सोमवारी जम्मू-काश्मीरमध्ये हल्ला घडवला. कठुआ जिल्ह्यातील त्या हल्ल्यात लष्कराच्या ४ जवानांना वीरमरण आले. तर, ६ जवान जखमी झाले. जम्मू विभागातील कठुआच्या दुर्गम भागात लष्करी वाहनांचा ताफा नियमित गस्त घालत होता. त्या ताफ्याला लक्ष्य करून दहशतवाद्यांनी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास ग्रेनेड फेकला.
त्यापाठोपाठ दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. त्याला जवानांनी तातडीने प्रत्युत्तर दिले. मात्र, दहशतवाद्यांनी नजीकच्या जंगलात पलायन केले. त्यांनी केलेल्या गोळीबारात १० जवान जखमी झाले. त्यातील चौघांची प्राणज्योत मालवली.
दहशतवादी हल्ल्याची माहिती समजल्यानंतर घटनास्थळी अतिरिक्त सुरक्षा बळ धाडण्यात आले. त्यानंतर सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये रात्री उशीरापर्यंत चकमक सुरू होती. चकमकीत सामील दहशतवाद्यांनी नुकतीच सीमेपलिकडून भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याचा अंदाज आहे.
याआधी शनिवारी काश्मीर खोऱ्यातील कुलगाम जिल्ह्यात दोन चकमकी झडल्या. त्यामध्ये सुरक्षा जवानांनी ६ दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्या चकमकींत लष्कराचे २ जवान शहीद झाले. जम्मू विभागातील शांतता भंग करून तिथे पुन्हा दहशतवादाचा फैलाव करण्याचा नापाक कावा कठुआमधील घटनेमुळे उघड झाला.
याआधी महिनाभरापूर्वी कठुआमध्ये चकमक झडली. त्यामध्ये २ दहशतवादी मारले गेले. तर, केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (सीआरपीएफ) एक जवान शहीद झाला.





