पुणे | तात्पुरत्या जाहिरातींसाठी ३८० जागा निश्चित

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राजकीय नेत्यांपासून ते गल्ली- बोळातील कार्यकर्त्यांकडून वाढदिवस, सामाजिक उपक्रम, जाहीर कार्यक्रम, तसेच इतर कारणांसाठी शहरभर जागा मिळेल तिथे महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता बोर्ड, बॅनर्स, फ्लेक्स, झेंडे लावले जातात.
त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होते. हे प्रकार टाळण्यासाठी आता महापालिकेकडून २०२२ मध्ये राज्य शासनाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करत शहरात ३८० ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात जाहिरातींसाठी परवानगी दिली जाणार आहे. या जागांची यादी महापालिका प्रशासनाकडून पालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर केली आहे.
त्यामुळे नागरिकांनी यापुढे क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून या जागांसाठी तात्पुरती परवानगी घेऊनच या जाहिराती कराव्यात, असे आवाहन महापालिकेच्या आकाशचिन्ह आणि परवाना विभागाने केले आहे.
या निश्चित केलेल्या जागांव्यतिरिक्त अनधिकृत बोर्ड, बॅनर, फ्लेक्स पोस्टर्स लावणाऱ्यांवर महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण कायदा १९९५ अंतर्गत दखलपात्र गुन्हे दाखल करण्यात येणार असून, त्यानुसार कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
माध्यमांशी बोलण्यास टाळाटाळ
महापालिकेकडून सर्व क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत एकूण ३८० जागा तात्पुरत्या बोर्ड, बॅनर, फ्लेक्स पोस्टर्स लावण्यासाठी निश्चित केल्या आहेत.
निश्चित केलेल्या जागांची यादी पुणे महानगरपालिकेच्या (https://www.pmc.gov.in/) या संकेतस्थळावर नागरिकांच्या सोयीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ही माहिती महापालिकेकडूनच माध्यमांना प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली. मात्र, किती आकाराचे फलक लावता येतील आणि त्यासाठी एका दिवसाला किती शुल्क असेल, याची कोणतीही माहिती प्रशासनाने दिली नाही.
ज्या विभागाने हे आदेश काढले आहेत, त्या विभागालाच ही माहिती नसल्याने या विभागातील अधिकाऱ्यांकडून माध्यमांशी बोलण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे समोर आले आहे.
अनधिकृत जाहिरात फलक तातडीने हटवा
शहरात विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर प्रत्येक चौकाचौकांत फ्लेक्स लावून इच्छुकांनी शक्तिप्रदर्शन केले आहे. परिणामी शहरभर अनधिकृत फ्लेक्सचा सुळसुळाट झाला असून, नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत.
त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डाॅ. राजेंद्र भोसले यांनी प्रशासनास दिले आहेत.





