पुणे | जन्म-मृत्यू नोंदणीचे कामकाज ठप्प

पुणे {प्रभात वृत्तसेवा} -जन्म-मृत्यू दाखले नोंदणीच्या तसेच दाखले वितरणासाठी असलेल्या संगणक यंत्रणेत सातत्याने तांत्रिक बिघाड होत आहेत.
परिणामी, नागरिकांना विहीत वेळेत दाखले देण्यास अडचणी निर्माण होत असल्याने नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
तसेच, केंद्रशासनाच्या प्रणालीनुसार हे काम सुरू असून त्याबाबत संबधित विभागाकडे तक्रार करण्यात आल्याचा खुलासाही प्रशासनाने केला आहे.
जन्म मृत्यू नोंदणी कार्यालयामार्फत जन्म मृत्यू नोंदणीचे कामकाज हे मार्च २०१९ पासून केंद्र शासनाने विकसित केलेल्या सीआरएस नागरी नोंदणी पद्धतीने १५ क्षेत्रिय कार्यालय स्तरावर उपनिबंधक तथा क्षेत्रिय वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत करण्यात येते.
केंद्र शासनाने या नोंदणी पध्दतीत जून २०२४ पासून बदल केले आहेत. त्यानुसार, जन्म मृत्यूचे दाखले हे केवळ संबंधित क्षेत्रिय कार्यालयाकडील उपनिबंधक तथा क्षेत्रिय वैद्यकीय अधिकारी यांच्या कार्यालयाकडूनच वितरीत करण्यात येतात.
तसेच ही प्रणाली संपूर्ण देशासाठी एकच आहे. त्यामुळे सदर संगणक प्रणाली बंद पडणे, मंद गतीने चालणे व इतरतांत्रिक अडचणीमुळे जन्म-मृत्यूचे दाखले संगणकीकृत करणेससद्यस्थितीत विलंब होत आहे.
परिणामी, महापालिकेकडे मोठया प्रमाणात तक्रारी वाढल्याने याबाबत जिल्हा निबंधक उपमुख्य निबंधक महाराष्ट्र राज्य, तसेच केंद्र शासन नागरी नोंदणी पद्धती (CRS) यांचेकडे महापालिकेने तक्रारही केली आहे.
मात्र, त्यानंतरही अद्याप या प्रणालीत सुधारणा झालेली नाही परिणामी दाखले मिळण्यास उशीर होत असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात येत आहे.





