कुकडी प्रकल्पात 36.19 टक्के साठा ; शेतकरी चिंतेत

गेल्या वर्षीच्या तुलनेत अत्यल्प साठा
लाखणगाव – कुकडी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या धरण परिसरात सध्या पावसाने दडी मारल्याने या सर्वच धरणांत वर्षाच्या तुलनेत अत्यल्प पाणीसाठा आहे. मागील वर्षी या धरणांमध्ये 25 जुलैला 68.80 टक्के पाणीसाठा झाला होता. मात्र, यावर्षी 36.19 टक्केच पाणीसाठा आहे. त्यामुळे येणाऱ्या कालखंडात पाऊस किती होतो व धरणे किती भरतात आणि यावरच पुढील पाण्याची नियोजन ठरणार आहे .
उत्तर पुणे जिल्ह्यातील कुकडी प्रकल्पांतर्गत येणारी आंबेगाव-जुन्नर तालुक्यातील धरणे आणि या धरणात साठणारे पाणी यावर या दोन तालुक्यांबरोबरच शिरूर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, करमाळा या तालुक्यांचाही समावेश होतो. कुकडी प्रकल्पांतर्गत डिंभे, वडज, माणिक डोह, पिंपळगाव जोगा या धरणांचा समावेश होतो.
नगर व पुणे जिल्ह्यातील शेतकरी व येथील शेती यावर अवलंबून आहे, त्यामुळे उत्तर पुणे जिल्ह्यातील अतिशय महत्त्वाचा असणारा कुकडी प्रकल्पातील पाणीसाठा अत्यल्प असल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण असून सर्व शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. अनेक ठिकाणी पेरणी खोळंबली आहे. काही ठिकाणी शेती ओली करून पेरण्या करण्यात आल्या आहेत.
एकंदरीत पावसाची परिस्थिती पाहता दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांपुढे उभे राहिले आहेत. या परिसरात मोठ्या प्रमाणात तरकारी पिके, पालेभाज्या, ऊस व जनावरांची चारा पिके घेतली जातात; परंतु पावसाने दडी मारल्याने सध्या शेतात असणाऱ्या पिकांनाही पाण्याचा प्रश्न जाणवू लागला आहे. पाण्याचे स्रोतही आटले असून शेतात असणाऱ्या पिकांना पाणी कुठून द्यायचे हाही प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे.





