Pradhan Mantri Awas Yojana : पुणे जिल्ह्यासाठी ३५ हजार परवडणारी घरे; ‘या’ सुविधा असणार

पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरासह ग्रामीण भागात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ३५ हजार घरे बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तीन लाख रुपयांच्या आत वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांसाठी ही घरे असून, परवडणाऱ्या दरात ही घरे उपलब्ध करून दिली जाणार आहे, तसेच ही घरे चांगल्या दर्जाची आणि ८० वर्षे टिकतील, अशी बांधण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
साखर संकुल येथे एका बैठकीनंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी पवार यांनी सांगितले की, पंतप्रधान आवास योजना शहरी या उपक्रमाअंतर्गत सर्वांसाठी घरे ही संकल्पना राबविण्यात येत आहे. यंदा केंद्र सरकारने राज्य शासनाला मोठे उद्दिष्ट दिले आहे. पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि ग्रामीण भागात ३५ हजार घरे बांधण्यात येणार आहे.
त्यासाठी दोन्ही शहरांत विविध ठिकाणी जागा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. बावधन येथे एक जागा निश्चित केली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि ग्रीन मानांकने वापरून ही घरे उभारण्यात येणार आहे. सोलर यंत्रणा, लिफ्ट आदी सुविधा असणार आहेत, असेही पवार यांनी या वेळी सांगितले.
अजित पवार म्हणाले….
शहरातच घरे उपलब्ध करून देण्यास प्राधान्य
तीन लाख रुपयांच्या उत्पन्न मर्यादा असणाऱ्यांना लाभ
शासनाचे अडीच लाख रुपयांचे अनुदान
बांधकाम कामगारांना महामंडळाकडून दोन लाख अनुदान
मुद्रांक शुल्क एक हजार रुपये
कर्जासाठी बँकाचे सहकार्य
परवडेल असाच असेल घराचा हफ्ता





