अफगाणिस्तानातून पाकमध्ये घुसखोरी करणारे ३० दहशतवादी ठार

पेशावर – पाकिस्तानच्या वायव्येकडील खैबर पख्तूनख्वा प्रांतात अफगाणिस्तानातून घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या किमान ३० दहशतवादी ठार झाले, अशी माहिती लष्करी माध्यम विभागाने शुक्रवारी दिली.
मंगळवार आणि बुधवार दरम्यानच्या रात्री उत्तर वझिरिस्तान जिल्ह्यातील हसन खेल भागात अफगाण सीमेवरून घुसखोरीचे प्रयत्न सुरक्षा दलांनी यशस्वीरित्या हाणून पाडले. मात्र सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या मोठ्या गटाच्या हालचालींना प्रत्युत्तर दिले.
यावेळी झालेल्या चकमकीदरम्यान पाकिस्तानात घुसण्याचा प्रयत्न करणारे ३० दहशतवादी मारले गेले, असे लष्करी माध्यम शाखेच्या एका निवेदनात म्हटले आहे. या दहशतवाद्यांच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात शस्त्रे, दारूगोळा आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत.
पाकिस्तानविरुद्ध दहशतवादी कारवायांसाठी परदेशी एजंट्स” कडून आपल्या भूमीचा वापर रोखण्याची जबाबदारी अफगाणिस्तानने घ्यावी, असेही या निवेदनात म्हटले आहे.





