पाकिस्तानात इसिसच्या कमांडरसह ३ दहशतवाद्यांना अटक

लाहोर – पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात आज इसिसच्या महत्वाच्या कमांडरसह ३ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली, असे पोलिसांनी शनिवारी सांगितले. पंजाब प्रांतातल्या फैसलाबाद, झेलम आणि चकवाल या शहरांमध्ये गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान दाएश (इसिस)च्या तीन दहशतवाद्यांना अटक करण्यात आल्याची माहीती पंजाब प्रांताच्या दहशतवाद विरोधी विभागाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात देण्यात आली आहे.
अटक केलेल्यांमध्ये इसिसचा महत्वाचा कमांडर अब्दुल वहाब याला देखील अटक केल्याचे निवेदनात म्हटले आहे. सैफुल्लाह आणि खुर्रम अब्बास अशी इतर दोन इसिस दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. या संशयितांकडून स्फोटके आणि शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांना पुढील तपासासाठी गोपनीय ठिकाणी हलवण्यात आले आहे.
गेल्या महिन्यात काऊंटर टेरेरिझम डिपार्टमेंटने ३८ संशयित दहशतवाद्यांना अटक केली होती. यातील बहुतेक जण इसिस आणि तेहरिक ए तालिबान पाकिस्तानशी संबंधित होते. दरम्यान खैबर पख्तुनख्वा प्रांताच्या सीटीडीने ४ दहशतवाद्यांना चकमकीत ठार केले. हे दहशतवादी खैबर पख्तुनख्वात मोठ्या हल्ल्याची तयारी करत होते. मरदान जिल्ह्यात झालेल्या चकमकीत हे दहशतवादी मारले गेले. या दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.





