स्टॉकहोम – स्वीडनमधील अपसाला भागात झालेल्या गोळीबारात ३ जण ठार झाले आहेत. या गोळीबार प्रकरणी पोलिसांनी १६ वर्षीय संशयिताला ताब्यात घेतले आहे. गोळीबारात मरण पावलेले तिघेही १५ ते २० वर्षांचे होते, असे पोलिसांनी म्हटले आहे. या गोळीबाराशी संबंधित माहिती गोळा करण्यासाठी पोलिसांनी घरोघरी जाऊन चौकशी केली. गोळीबारात ठार झालेल्यांच्या नातेवाईकांशी आतापर्यंत संपर्क होऊ शकलेला नाही. या गोळीबाराची घटना समजल्यानंतर पोलिसांनी व्यापक प्रमाणात तपास अभियान सुरू केले आहे. गोळीबारानंतर संशयित इलेक्ट्रीक स्कूटरवरून घटनास्थळावरून पसार झाला होता, असे एका वृत्तवाहिनीने म्हटले होते. गोळीबाराचा आवाज ऐकून काही नागरिकांनी या संशयिताला बघितले होते. त्याच्या आधारे एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. स्वीडनमध्ये घातक शस्त्राच्या आधारे हिंसाचार होण्याचे प्रमाण अलिकडच्या काळात वाढले आहे. त्यामुळे बंदुकीचा परवाना मिळण्यासाठीचे नियम अधिक कडक करण्याबाबत विचार केला जातो आहे. काही महिन्यांपुर्वी एका प्रशिक्षण केंद्रामध्ये घुसून अशा प्रकारे स्वैर गोळीबार केला गेला होता. त्या गोळीबारात किमान १० जण ठार झाले होते. ही स्वीडनमधील आतापर्यंतची सर्वात वाईट हिंसाचाराची घटना होती, असे पंतप्रधान उल्फ क्रिस्टर्सन यांनी म्हटले होते.