कर्जत, (प्रतिनिधी) – राज्यातील रेहकुरी काळवीट अभयारण्य वनक्षेत्रातील तीन देवस्थान परिसराचा निसर्ग पर्यटन स्थळ म्हणून विकास व्हावा, याकरिता आमदार प्रा.राम शिंदे यांनी हाती घेतलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. सन २०२४ -२०२५ करिता निसर्ग पर्यटनस्थळांचा विकास या राज्य योजनेतून वनविभागाने तीन देवस्थानसाठी ३ कोटी २४ लाख रूपयांचा निधी मंजूर केला आहे. याबाबतचा शासन निर्णय १४ ऑक्टोबर रोजी महसूल व वन विभागाने जारी केला आहे. काळवीट व हरणांसाठी राज्यात प्रसिध्द असलेल्या रेहकुरी अभयारण्य क्षेत्रात तुकाईमाता मंदिर, वनदेव मंदिर व आप्पाबुवा मंदिर असे तीन जागृत देवस्थान आहेत. अतिशय निसर्गरम्य असा हा परिसर आहे. या देवस्थानांचा विकास व्हावा, अशी येथील ग्रामस्थ व भाविकांची मागणी होती. याच मागणीची दखल घेऊन आमदार प्रा.राम शिंदे यांनी देवस्थानचा निसर्ग पर्यटन स्थळ म्हणून विकास व्हावा, याकरिता शासन दरबारी पाठपुरावा हाती घेतला होता. आमदार प्रा.राम शिंदे यांच्या पाठपुराव्याची दखल घेत महायुती सरकारने सन २०२४ -२०२५ करिता निसर्ग पर्यटन स्थळांचा विकास )या राज्य योजनेतून कर्जत तालुक्यातील रेहकुरी काळवीट अभयारण्य परिसरातील तुकाईमाता मंदिर बिटकेवाडी, वनदेव मंदिर हंडाळवाडी व आप्पाबुवा मंदिर बेलवंडी या देवस्थानचा विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी वनविभागाकडून सुमारे ३ कोटी २४ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय महसूल व वनविभागाकडून जारी करण्यात आला आहे. या निधीतून देवस्थान परिसराचा निसर्ग पर्यटनस्थळ म्हणून विकास होणार आहे.