खेड, (वार्ताहर)- खेड राज्यमार्ग ते शिंपोरा-मानेवाडी या एकूण साडे पाच किमी अंतर असलेल्या रस्त्यापैकी तीन किमी रस्त्याला जानेवारी महिन्यातच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजुरी मिळालेली आहे. आता उर्वरित अडीच किमी रस्त्याच्या मागणीसाठी खेड, शिंपोरा, औटेवाडीच्या पदाधिकारी-ग्रामस्थांनी आ.राम शिंदे यांची चौंडी येथे भेट घेत निवेदन दिले. आ. राम शिंदे यांच्या प्रयत्नातून जानेवारीमध्ये तीन किमी अंतराच्या रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून पावणेतीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या मंजूर रस्त्याचे कामही सुरू करण्यात आले होते, मात्र काही कारणास्तव संबंधित ठेकेदाराने अचानक काम बंद केले. याबाबत शिंपोरा गावचे माजी उपसरपंच यांनी आ.राम शिंदे यांना काम सुरू करण्याबाबत निवेदन देऊन विनंती केली. खेड ते शिंपोरा हा रस्ता खेड, शिंपोरा,औटेवाडी या तीनही गावांच्या हद्दीवर असून या सर्व गावांचा हा शिवार रस्ता आहे. सध्या हा रस्ता इतका खराब झाला आहे की, रस्त्यावरून वाहतूक करणे जिकिरीचे बनले आहे. पावसाळ्यात तर या रस्त्यावरून जाताना शाळकरी विद्यार्थी, शेतकरी ग्रामस्थांना अतोनात हाल सहन करावे लाग आहेत. परिसरातील हजारो टन उसाची वाहतूक याच मुख्य रस्त्यावरून होत असते. मात्र, साडेपाच किमी अंतरापैकी निम्म्याच अंतराच्या रस्त्याला मंजुरी मिळाल्याने रस्त्याचा प्रश्न पूर्णपणे सुटलेला नाही. आ. राम शिंदे यांनी कायमच या भागात रस्ते करण्यासाठी याअगोदरही भरीव निधी दिला आहे. त्यामुळे मागणी करण्यात आलेल्या रस्त्यालाही भविष्यात निधी उपलब्ध करून देण्याचा शब्द आ. राम शिंदे यांनी दिला. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष धनंजय मोरे, खेडचे माजी उपसरपंच सुनील गायकवाड, शिंपोऱ्याचे माजी सरपंच निवृत्ती कानगुडे, उपसरपंच महेंद्र काळे, माजी उपसरपंच दिपक शेटे, ग्रा.पं.सदस्य हनुमंत रणवरे, तंटामुक्तीचे उपाध्यक्ष चंद्रकांत आगवण, आण्णासाहेब मोरे, चंद्रकांत मोरे, सोमनाथ वाघमारे, राजेंद्र आगवण, ऋषिकेश वाघमारे, सोपान जंजिरे, नवनाथ मोरे, विशाल हराळ आदी उपस्थित होते. काम एकाने मंजूर, बोर्ड दुसऱ्यानेच लावला! शिंपोरा भागातील रस्त्याचे जाळे मजबूत करण्यासाठी आ. राम शिंदे यांनी आत्तापर्यंत कोट्यावधी रुपयांचा निधी दिला आहे. आ. शिंदेच्या माध्यमातून काम मंजूर झाल्यानंतर आ. पवारांनी बोर्ड लावण्यासाठी कायमच पुढाकार घेतला आहे. ‘कामाच्या नावाने बोंब मात्र जाहिरातीत मात्र पुढे’ अशी चर्चा ग्रामस्थ करत आहेत.