कोयनानगर – सह्याद्रीच्या बफर झोनमध्ये वसलेले नवजा हे गाव निसर्गसंपन्नतेमुळे पर्यटनासाठी योग्य ठिकाण ठरत आहे. पावसाळी पर्यटनासाठी नवजा पर्यटकांचे आकर्षण बनले आहे. येथील पर्यटन व्यवस्थापनाची जबाबदारी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेअंतर्गत स्थापन झालेल्या स्थानिक जनवन समितीकडे सोपवण्यात आली आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना गत दोन वर्षांपासून गावात प्रभावीपणे राबवली जात आहे. समिती स्थापन करण्यापूर्वी गावात वारंवार बैठका घेऊन, शासन निर्णयाचा अभ्यास करून आणि ग्रामपंचायतीच्या ठरावानंतरच ही प्रक्रिया पार पडली. जनवन समितीचा मुख्य उद्देश गावातील लोकांवरचा जंगलाचा अवलंबित्व कमी करणे, पर्यावरणपूरक व्यवसाय निर्माण करणे आणि गावातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे. पर्यटनाच्या दृष्टीने नवजा परिसर अत्यंत संपन्न असून येथे ओझर्डे धबधबा, कोकण कडा, अमेझोन पॉईंट, यमकर पॉईंट, जंगली जयगड ट्रेक, निसर्ग पायवाट, निरीक्षण मनोरा व सफारी मार्ग अशी विविध ठिकाणे पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहेत. या ठिकाणी वन विभाग व पर्यटन विभागाच्या निधीतून सुविधांचे उभारणी कार्य सुरू आहे. पर्यटन विभागाकडून ओझर्डे धबधब्याजवळ स्काय वॉक प्रकल्प मंजूर करण्यात आला असून त्याच्या कामाला लवकरच प्रारंभ होणार आहे. यामुळे पर्यटकांना धबधब्याचा अनुभव हवाई मार्गाने घेता येणार असून निसर्ग पर्यटनाला नवे आकर्षण मिळणार आहे. विशेषतः वयस्कर पर्यटकांसाठी सुलभ बैठकीची व्यवस्था, छोट्या धबधब्यांचा आनंद घेण्याची सुविधा, तसेच महिला पर्यटकांसाठी चेंजिंग रूम, स्वच्छतागृह, तक्रार वही, प्रथमोपचार पेटी यासारख्या मूलभूत सुविधा विकसित करण्यात येत आहेत. सध्या जनवन समितीद्वारे सात स्थानिक तरुणांना पर्यटनस्थळी रोजगार देण्यात आला आहे. भविष्यात अधिक रोजगारनिर्मितीसाठी प्रशिक्षण शिबिरे, महिला बचत गटांचे सहभाग, स्थानिक उत्पादने व सेवांचे मार्केटिंग यावर भर दिला जाणार आहे. नवजा गाव हे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये येते. त्यामुळे शासन निर्णयानुसार येथे प्रवेश शुल्क आकारण्यात येत असून त्यातून मिळणारा निधी निसर्ग रक्षण, सुविधा देखभाल आणि संवर्धनासाठी वापरला जात आहे. या प्रक्रियेमध्ये वन विभाग, पर्यटन विभाग, महसूल, मत्स्य व जलसंपदा विभागांचा समन्वय साधण्यात येत आहे. पर्यटनमंत्री तथा पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून ओझर्डे धबधब्यावर उभारला जाणारा स्काय वॉक, नवजाच्या पर्यटन क्षेत्राला निश्चितच नवी झेप देणार आहे. जनसहभाग, निसर्ग रक्षण व आर्थिक विकास यांचा संगम असलेले नवजाचे ‘जनवन मॉडेल’ पर्यावरणपूरक पर्यटनाचा आदर्श ठरण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.