खेड, (वार्ताहर) – ‘मी कधी कुणाला दम दिला नाही, भीती दाखवली नाही. मला सगळ्यांनी त्रास दिला पण आपला कुणाला त्रास झाला का? पण जो गडी आलाय तो सगळ्यांना त्रास देतोय. आपलं दुःख आपल्यालाच कळतं. आता आपल्याला सावड फेडायची आहे. मी सर्वांसाठी उभा आहे. करण्यासारखं कोणतेही काम असेल तर घेऊन या, मी पडलो तरी आपलाच झालो. अडचणीच्या काळात लोकप्रतिनिधी कामाला आला नाही तर त्याचा काय उपयोग? सर्वांना मान- सन्मान मिळेल, कुणालाही पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही, हा माझा शब्द आहे, असे मत आ. राम शिंदे यांनी व्यक्त केले. तालुक्यातील दुधोडी व बेरडी या रोहित पवारांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या गावातून आ. पवारांच्या कारभाराला वैतागून रोहित पवार कट्टर समर्थक असलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश करत आ. राम शिंदेना मोठ्या ताकदीने साथ देण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे या प्रवेशात काही ग्रामपंचायत व सेवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे. या सर्व पदाधिकारी-कार्यकर्त्यांचे आ. राम शिंदे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. या दोन्हीही गावात आ. राम शिंदेच्या कार्यकाळात झालेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. अनेकांनी रोहित पवारांनी दुर्लक्ष केलेल्या कामांबाबत आ. राम शिंदेना माहिती दिली. रोहित पवारांबद्दल नाराजी व्यक्त करताना अनेकांनी आपापले मत मांडली. तालुकाध्यक्ष शेखर खरमरे, बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर, माजी जि.प.सदस्य प्रवीण घुले, लाडकी बहीण योजनेचे समिती सदस्य धनंजय मोरे, जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुनील यादव, योगेश भोसले, कुमार भोसले, हौसराव भोसले, गणेश भोसले आदींसह अनेकांनी मनोगते व्यक्त केली.