Baramati : ज्ञानसागरच्या २९ खेळाडूंची राज्यस्तरापर्यंत झेप
Baramati : शासकीय जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेत श्रेया गोरे आणि वेदिका बारे यांनी उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक मिळविला.

बारामती : तालुक्यातील ज्ञानसागर गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्राबरोबरच क्रीडा क्षेत्रातही आपल्या गुणवत्तेचा आणि मेहनतीचा ठसा उमटविला आहे. विविध शासकीय तालुका, जिल्हा व विभागस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यालयातील खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत जिल्हा, विभाग तसेच राज्यस्तरीय स्पर्धांसाठी निवड होण्याचा बहुमान मिळविला आहे. तब्बल २८ खेळाडूंची विविध शासकीय क्रीडा स्पर्धांसाठी निवड झाल्याने ज्ञानसागर गुरुकुलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. विद्यालयातील खेळाडूंनी तायक्वांदो, ॲथलेटिक्स, कराटे, स्केटिंग, कुस्ती, मैदानी स्पर्धा , बॉक्सिंग आणि वूशु या विविध क्रीडा प्रकारांत उत्कृष्ट कामगिरी केली. विशेष म्हणजे काही खेळाडूंनी विभागस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत राज्यस्तरीय स्पर्धेपर्यंत मजल मारली आहे.
तायक्वांदोमध्ये पाच खेळाडूंची जिल्हास्तरीय निवड
शासकीय तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत ज्ञानसागर गुरुकुलच्या सोहेल खान, सुकृत तुपे, कृष्णा सूर्यवंशी, ऋग्वेद वराडे आणि सार्थक ताकमोगे यांनी आपल्या गटात प्रथम क्रमांक मिळवून उत्कृष्ट कामगिरी केली. या यशाच्या जोरावर या पाचही खेळाडूंची जिल्हास्तरीय शासकीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली.
ॲथलेटिक्समध्येही दमदार कामगिरी
शासकीय तालुकास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत प्रणव रांधवन याने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळविला. त्याची जिल्हास्तरीय शासकीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाली. तसेच यश मासाळ याने गोळाफेकमध्ये द्वितीय क्रमांक, लखन शिरसट याने थाळीफेकमध्ये तृतीय क्रमांक, वेदांगी भिसे हिने १०० मीटर धावणे प्रकारात द्वितीय क्रमांक, तर समीक्षा मेत्रे हिने लांबउडीमध्ये तृतीय क्रमांक मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली. अथर्व सचिन भगत आणि श्रीकृष्ण राजेंद्र घाडगे यांनी आपापल्या गटात प्रथम क्रमांक मिळवत जिल्हास्तरीय शासकीय कराटे स्पर्धेसाठी पात्रता मिळविली. त्याचबरोबर मोहित रावी याने द्वितीय क्रमांक, तर अर्णव मटकर, ओम गरजे, कृष्णा गायकवाड आणि जानवी वाघमारे यांनी तृतीय क्रमांक मिळवत विद्यालयाच्या यशात भर घातली.
स्केटिंगमध्ये विभागीय स्पर्धेसाठी निवड
शासकीय जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेत श्रेया गोरे आणि वेदिका बारे यांनी उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक मिळविला. शासकीय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत गुंजन गावंडे हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक मिळविला. तिची जिल्हास्तरीय शासकीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली असून, तिच्या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
संघाची सुवर्णकामगिरी
शासकीय तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत ज्ञानसागर गुरुकुलच्या १४ वर्षे वयोगटातील मुलांच्या संघाने ४ x १०० मीटर रिले या क्रीडा प्रकारात उत्कृष्ट वेग, समन्वय आणि संघभावनेचे दर्शन घडवत प्रथम क्रमांक पटकावला. शासकीय विभागस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत ज्ञानसागर गुरुकुलच्या राजवीर कौले, शिवराजे कौले आणि नमन होले या तिन्ही खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक मिळविला. या शानदार कामगिरीमुळे तिन्ही खेळाडूंची राज्यस्तरीय शासकीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. वूशुमध्ये सार्थक ताकमोगेची राज्यस्तरीय मजल शासकीय विभागस्तरीय वूशु स्पर्धेत सार्थक ताकमोगे याने दमदार कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळविला. या यशामुळे त्याची राज्यस्तरीय शासकीय वूशु स्पर्धेसाठी निवड झाली आहे.तायक्वांदो आणि वूशु या दोन्ही क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी करत सार्थकने विद्यालयाच्या क्रीडा गुणवत्तेचा विशेष ठसा उमटविला आहे.





