Pakistan : पाकिस्तानात बस दरीत पडून २८ ठार

कराची – पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतात एक बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात किमान २८ जण ठार आणि अन्य २२ जण जखमी झाले. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे.
तुर्बतहून क्वेट्टाकडे निघालेली ही बस बलुचिस्तान प्रांताची राजधानी क्वेट्टापासून सुमारे ७०० किलोमीटर अंतरावर असलेल्या वाशुक शहराजवळ दरीत कोसळली.
बसमधील ६ प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर रुग्णालयात नेत असताना अन्य २२ जणांचा मृत्यू झाला, असे सहायक आयुक्त इस्माईल मेंगल यांनी सांगितले.
या प्रवासी बसचा टायर एका वळणावर फुटला आणि चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बस खोल दरीत कोसळली, असे मेंगल यांनी सांगितले.बस अतिवेगात असल्यामुळे हा अपघात झाल्याचे आगोदर सांगितले गेले होते. मृतांमध्ये ३ महिला आणि ३ लहान मुलेही असल्याचेही मेंगल यांनी सांगितले.
बसमध्ये सुमारे ५० प्रवासी असल्याने बचावकार्य अजूनही सुरूच होते. बसमध्ये आणखी काही प्रवासी असू शकतात. मृतांंपैकी बहुतेकांची ओळख आताप्रयंत पटू शकलेली नाही, असेही त्यांनी सांगितले.
गंभीर असलेल्या इतर चार प्रवाशांना ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यासाठी हेलिकॉप्टरद्वारे क्वेटा येथे नेण्याची विनंती पाकिस्तानी लष्कराला करण्यात आली आहे.





