पुणे | नाशिक विभागातून २५० गाड्या मागविल्या

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – दिवाळी सणानिमित्त पुण्यातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाणाऱ्या प्रवाशांना चांगली आणि वेळेत सेवा मिळावी, यासाठी एसटी विभागाकडून जादा बसगाड्या सोडण्यात येतात.
मात्र, यंदा एसटीच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी झाल्यामुळे आणि प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बीड, लातूर, अकोला आणि नाशिक विभागांतून २५० जादा गाड्या मागविण्यात आल्याची माहिती पुणे एसटी विभाग प्रशासनाकडून देण्यात आली.
शिक्षण, नोकरी किंवा व्यवसायानिमित्त पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरात वास्तव्यास असलेले चाकरमानी आणि विद्यार्थी दिवाळीला गावी जातात. त्या वेळी रेल्वे आणि एसटीला प्रचंड गर्दी असते, तर खासगी बसचालक वारेमाप तिकीट आकारतात.
त्यामुळे बहुतांश प्रवासी हे दिवाळीआधीच तिकीट बुकिंग करतात. त्याचप्रमाणे एसटी बसचे बुकिंगही जोरात सुरू आहे.
मात्र, दरवर्षी शहरातील स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन, वल्लभनगर या एसटी स्थानकांवर प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता यंदा पुणे विभागातील एसटीच्या ताफ्यातील बसची संख्या कमी होत आहे.
सध्या पुणे विभागात उपलब्ध असलेल्या ८१५ बसपैकी ५२१ बस या दहा वर्षे वयोमर्यादा ओलांडलेल्या आहेत. त्यामुळे या बस जीर्ण आणि खिळखिळ्या झाल्या आहेत. वारंवार रस्त्यात बस बंद पडत असल्याने या बस लांबच्या मार्गावर सोडता येत नाहीत.
केवळ मुंबई, कोल्हापूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर या मार्गांवर काही प्रमाणात ई-शिवनेरी, शिवाई गाड्या चालविल्या जातात; परंतु इतर मार्गांवर किंवा महत्त्वाच्या मार्गावर जुन्या बस सोडल्यावर प्रवाशांना धक्के खातच प्रवास करावा लागतो.
त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बाहेरच्या विभागातून चांगल्या स्थितीत असलेल्या जादा गाड्या मागविण्यात येणार आहेत.
नवीन गाड्यांची प्रतीक्षाच…
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात नवीन ई-शिवाई, शिवनेरी आणि लालपरी दाखल होण्यासाठी वेळ लागत आहे. नवीन लालपरी दिवाळीअधी येतील, अशी अपेक्षा होती. मात्र, त्यालाही वाट पाहावी लागत असून, त्या दिवाळीमध्ये किंवा दिवाळीनंतर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
दुसरीकडे विविध सवलतीमुळे एसटीची प्रवासी संख्या दीडपट वाढली आहे. त्यामुळे महामंडळाकडून दिवाळीच्या काळात जादा गाड्यांचे नियोजन करणे गरजेचे आहे.
मात्र, इतर विभागांतील गाड्यांची पळवापळवीच सुरू आहे. केवळ तात्पुरत्या गाड्यांचे नियोजन न करता, कायमस्वरूपी एसटी बस वाढविण्याची गरज आहे.
महत्वाचे…
महामंडळाच्या बसेस…
एकूण उपलब्ध बसेस- ८१५
मार्गावरील बसेस- ७४७
दहा वर्षे वयोमर्यादा ओलांडलेल्या बस – ५२१
खासगी तत्त्वावरील बसेस – ८३



