Shikrapur News : कोंढापुरीत गरबा पाहायला गेलेल्या तरुणाची निर्घृण हत्या; अवघ्या २४ तासांत ३ जण गजाआड
Shikrapur News : कोंढापुरी येथे गरबा पाहायला गेलेल्या २४ वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने सपासप २० वार करून अतिशय निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Shikrapur News : शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथे युवकाच्या खुनाच्या घटनेने खळबळ उडाली आहे. खंडोबा मंदिर परिसरातील तळ्याजवळ महेंद्र सकट (वय २४) याचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. या गुन्ह्याचा शिक्रापूर पोलिसांनी अवघ्या एका दिवसात छडा लावला असून, प्रथमेश नानासाहेब राऊत (वय २२) याला अटक करण्यात आली आहे. तर दोन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे. (Shikrapur News)
गरबा पाहताना मित्रांमध्ये वाद?
महेंद्र सकट हा रांजणगाव गणपती परिसरातील करडे रोड येथे राहत होता. त्याचं मूळ गाव पाचेगाव बुद्रुक, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर आहे. कोंढापुरीतील खंडोबा मंदिर परिसरातील तळ्याजवळ त्याचा मृतदेह आढळल्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. (Shikrapur News)
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, महेंद्र आणि आरोपी एकमेकांचे मित्र होते. कोण कोणासोबत फिरायचं आणि कोणाशी बोलायचं, या कारणावरून त्यांच्यात वाद असल्याचं समोर आलं आहे. गरबा पाहण्याच्या पार्श्वभूमीवर महेंद्रला निर्जनस्थळी नेण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. (Shikrapur News)
गांजा पिण्याचं आमिष दाखवून निर्जनस्थळी नेल्याचा आरोप
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी महेंद्रला गांजा पिण्याचं आमिष दाखवून निर्जनस्थळी नेलं. तेथे त्याच्यावर चाकूने सुमारे २० वार करून खून केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर आरोपी अहिल्यानगरच्या दिशेने पळून गेल्याचं तपासात निष्पन्न झालं. या प्रकरणी महेंद्रचे वडील लव विष्णू सकट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. (Shikrapur News)
अहिल्यानगरमध्ये तीन पथकांची कारवाई
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तीन पथके तयार केली. या पथकांनी अहिल्यानगर गाठून बेलापूर बायपास परिसरातून संशयितांना ताब्यात घेतलं. (Shikrapur News)
चौकशीनंतर प्रथमेश नानासाहेब राऊत याला अटक करण्यात आली असून, दोन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंतराव गिरी, पोलीस हवालदार नितीन सुद्रिक आणि राहुल गडदे करत आहेत. (Shikrapur News)
या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंतराव गिरी, पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, जिनेश कोळी, अंकुश कारंडे तसेच पोलीस कर्मचारी अमोल दांडगे, रोहिदास पारखे, शिवाजी चितारे, विश्वांबर वाघमारे, अमोल चव्हाण, राम जाधव, नागेश वाघमारे, नारायण वाळके आणि मच्छिंद्र निचित यांनी सहभाग घेतला. (Shikrapur News)





