पाकिस्तानच्या २३ खलाशाची नौदलाने केली सुटका; खलाशांनी केला भारताचा जयजयकार

नवी दिल्ली – सोमाली चाच्यांनी ताब्यात घेतलेल्या २३ पाक खलाशांची भारतीय नौदलाने केलेल्या धडक कारवाईमध्ये सुटका करण्यात आली आहे. अरबी समुद्रात झालेली ही कारवाई शनिवारी तब्बल १२ तासांपर्यंत चालली होती. सुटकका केल्यानंतर या ९ सागरी चाच्यांना अटक करण्यात आली असून त्यांना कायदेशीर कारवाईसाठी भारतात आणले जात आहे, असे नौदलाच्यावतीने सांगण्यात आले.
सागरी चाच्यांविरोधातल्या या कारवाईला शुक्रवारी पहाटे सुरुवात झाली. एफव्ही- एआय- कांबर या इराणी मासेमारी नौकेचे सोमालियाच्या सागरी चाच्यांनी अपहरण केल्याचे समजल्यावर आयएनएस सुमेधा या नौदलाचच्या जहाजाने या चाच्यांचा पाठलाग केला.
हे इराणी जहाज सोकोत्राच्या दक्षिण-पश्चिमेला अंदाजे ९० सागरी मैल अंतरावर होते आणि त्यावर नऊ सशस्त्र समुद्री चाच्यांनी कब्जा केल्याचे वृत्त समजले होते. या कामात आयएनएस त्रिशुल या क्षेपणास्त्रवाहक नौकेने मोलाची कामगिरी बजावली.
भारतीय नौदल दलाने चाच्यांशी वाटाघाटी सुरू केल्या, त्यांना रक्तपात न करता आत्मसमर्पण करण्यास भाग पाडले. या शरणागतीने भारतीय नौदलाचा चाचेगिरीचा मुकाबला करण्यात आणि या प्रदेशातील सागरी कारवाईमध्ये निर्णायक विजय नोंदवला.
समुद्री चाच्यांना पकडण्यात यश मिळाल्यानंतर, भारतीय नौदल तज्ञांच्या पथकांनी अल-कंबरची पूर्ण तपासणी केली. त्यानंतर ९ सोमाली चाच्यांना घेऊन भारतीय नौदलाची जहाजे बारताच्या किनारपट्टीकडे निघाली असून भारतात पोचल्यावर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला, भारतीय नौदलाने एका धाडसी कारवाईत, भारतीय किनारपट्टीच्या किनाऱ्यापासून जवळजवळ २६०० किमी अंतरावर असलेल्या रुएन जहाजावर हल्ला करणारे चाच्यांचे जहाज रोखले आणि समुद्री चाच्यांना थांबवण्यास भाग पाडले होते.
पाकिस्तानी खलाशांनी केला भारताचा जयजयकार
इराणी मासेमारी जहाजावर असलेल्या २३ पाक खलाशांची सुटका करण्यात आल्यावर या सर्व खलाशांनी भारताच्या जयजयकाराच्या घोषणा दिल्या. आणि त्वरित मदत केल्याबद्दल भारतीय नौदलाला धन्यवाद देखील दिले.





